Odisha Train Accident : ओडिशाच्या (Odisha) बालासोरमधील (Balasore) रेल्वे अपघातानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचं काम सुरु आहे. बालासोर रेल्वे अपघातस्थळी रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं आहे. याबाबत माहिती देताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव भावूक झाले. अपघातग्रस्त भागातून आज पहाटे पहिली ट्रेन रवाना झाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळी उपस्थित राहून या कामावर देखरेख केली. 


"आमची जबाबदारी अजून संपलेली नाही"


ट्रॅक दुरुस्तीच्या कामाबाबत माहिती देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, आता दोन्ही बाजूंनी म्हणजेच अप आणि डाऊन रेल्वे वाहतुकीसाठी ट्रॅक पूर्णपणे तयार झाला असून मोकळा करण्यात आला आहे. हे सांगताना रेल्वे मंत्र्यांना अश्रू अनावर झाले. अपघातातील बेपत्ता लोकांचा उल्लेख करताना त्यांचा कंठ दाटून आला. आमची जबाबदारी अजून संपलेली नाही, असं त्यांनी सांगितलं.


बेपत्ता लोकांचा शोध घेणे हे आमचे ध्येय : रेल्वेमंत्री


ओडिशा रेल्वे अपघातातील अनेक जण अद्यापही बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांची माहिती देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव भावूक झाले. यावेळी त्यांनी म्हटलं की,  "बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर त्यांच्या नातेवाईकांना भेटता यावे, हा आमचा उद्देश आहे. ते लवकरात लवकर सापडावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. आमचं कर्तव्य अजून संपलेली नाही." रेल्वे रुळ दुरुस्त झाल्यानंतर रुळावरून वाहतूक सुरु झाल्यावर रेल्वे मंत्र्यांनी माहिती देत सांगितलं की, तीन गाड्या रवाना झाल्या आहेत. रात्री सात गाड्या रवाना होणार आहेत.


ओडिशा रेल्वे अपघातात 288 जणांचा मृत्यू


ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला तर, 1000 हून अधिक जण जखमी झाले. सध्या शेकडो जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 2 जून रोजी ओडिशामध्ये तीन ट्रेनचा भीषण अपघात झाला. यामध्ये शेकडो लोकांना जीव गमवावा लागला. प्रकरणाची सध्या चौकशी सुरु असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी दिलं आहे.


अपघातानंतर 51 तासांनंतर पहिली ट्रेन रवाना


ओडिशाच्या भीषण अपघातानंतर तब्बल 51 तासांनी बालासोर  येथील अपघातग्रस्त भागातून पहिली ट्रेन रवाना झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मालगाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी अनेक माध्यमांचे प्रतिनिधी आणि रेल्वे अधिकारी उपस्थित होते. मालगाडी विशाखापट्टणम बंदरातून राउरकेला स्टील प्लांटकडे जात होती. तसेच, ज्या रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी भीषण अपघात झाला होता, त्याच रेल्वे ट्रॅकवरुन मालगाढी रवाना झाली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Odisha Train Accident: रेल्वे दुर्घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय; ओडिशा पोलिसांचं निवेदन, नेमका कोणाकडे इशारा?