एक्स्प्लोर
प. बंगालऐवजी गुजरात दंगलीचे फोटो शेअर, भाजप प्रवक्त्यांवर चौफेर टीका
नवी दिल्ली : दिल्ली भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा एका फोटोमुळे चांगल्याच वादात सापडल्या आहेत. नुपूर शर्मा यांनी सध्या पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा फोटो म्हणून गुजरातमधील 2002 च्या दंगलीचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळेच ट्विटरवर त्यांना चांगलंच झोडपलं जात आहे.
नुपूर शर्मा यांनी 7 जुलैला हा फोटो ट्विट केला. त्या म्हणाल्या, "आता बोलण्याची वेळ आली आहे. यापूर्वीच खूप उशीर झाला आहे. #SaveBengal आणि #SaveHindus हे हॅशटॅग वापरून, जनतेने जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन केलं होतं.
नुपूर यांनी शेअर केलेल्या फोटोवर ट्विटराईट्सनी रिप्लाय देऊन, हा फोटो 2002 च्या गुजरात दंगलीचा असल्याचं दर्शवलं. तसंच त्यांच्यावर अफवा पसरवण्याचा आरोपही केला.
मात्र त्यावर उत्तर देताना नुपूर म्हणाल्या, ठिकाण कोणतं हे महत्त्वाचं नाही, तर या फोटोवरुन बंगालमधील वास्तविकता दिसून येते.
सध्या हे ट्विट त्यांच्या अकाऊंटवर अजूनही आहे. त्यासोबत त्यांनी आणखी फोटोही ट्विट केले आहेत.
फेसबुक पोस्टमुळे तणाव
वादग्रस्त धार्मिक फेसबुक पोस्टमुळे पश्चिम बंगालमधील बशीरहाट इथं हिंसाचार झाला. गेल्या काही दिवसांपासून इथं तणावाचं वातावरण आहे.
वाढलेल्या तणावामुळे इथे बीएसएफची एक तुकडीही तैनात करण्यात आली. मात्र तरीही हिंसक जमावाने तोडफोड आणि पोलिसांवर दगडफेक केली.
तणाव वाढला
या हिंसाचारात कार्तिक घोष या तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर तणावाच्या परिस्थितीत मोठी वाढ झाली.
भाजपने कार्तिक घोष हा आपला कार्यकर्ता असल्याचं म्हटलं आहे. तसंच तृणमूल काँग्रेसचे आमदार दीपेंदु विस्वास यांच्या सांगण्यावरुनच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांविरोधात शोधमोहीम सुरु केली आहे, असा भाजपचा आरोप आहे.
आमच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक अटक करण्यात येत आहे, असाही आरोप भाजपचा आहे.
यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपचं तीन सदस्यांचं प्रतिनिधीमंडळ बशीरहाटला पाठवण्याची घोषणा केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement