UP Bjp Meeting : विधानसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपने पुन्हा सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. मागच्या निवडणुकीपेक्षा जरी भाजपचे संख्याबळ कमी झाले असले तरी बहुमत मिळवण्यात भाजपला यश आले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये नवीन मंत्रीमंडळ आणि सरकार स्थापनेसाठी भाजपच्या बैठका आणि विचारमंथन सुरु आहे. याच अनुषंगाने योगी आदित्यनाथ हे आज पुन्हा दिल्लीचा दौरा करणार आहेत. यूपी मंत्रीमंडळ विस्तार आणि सरकार स्थापनेबाबत आज दिल्लीत भाजपच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित राहणार आहेत. 


उत्तर प्रदेशचे भाजप अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, संघटन मंत्री सुनील बन्सल, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा या बैठकीसाठी मंगळवारी दिल्लीत पोहोचले आहेत. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित राहणार आहेत.


यूपी मंत्रिमंडळाबाबत दिल्लीत विचारमंथन


दिल्लीत होणाऱ्या या बैठकीला यूपीचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान आणि संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोषही उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी सलग दोन दिवस दिल्लीत बैठका घेतल्या होत्या. 
योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात पुन्हा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले असले तरी यावेळी यूपीमध्ये किती उपमुख्यमंत्री होणार आणि मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार यावर सस्पेन्स कायम आहे. या दृष्टीने ही बैठक विशेष असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण या बैठकीत योगी आदित्यनाथ सरकारच्या नवीन मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे निश्चित केली जाणार आहेत.


योगींच्या शपथविधीची तयारी सुरु 


दरम्यान, गृहमंत्री अमित शाह आणि रघुवर दास लखनऊला जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, ही प्रक्रिया होळीनंतर होणार आहे. त्याचबरोबर योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. यूपीच्या प्रत्येक जिल्ह्यात एलईडी स्क्रीन लावून सोहळा थेट दाखवण्याची योजना करण्यात येत आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. मंगळवारी अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही स्टेडियमची पाहणी केली आहे. भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्याचाही विचार केला जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या: