Bhagwant Mann : आम आदमी पार्टीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा हा स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांचे मूळ गाव खटकर कलान येथे होणार आहे. आज दुपारी साडेबारा वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे. यासाठी पंजाबमधून तीन लाख लोक येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शपथविधी सोहळ्यासाठी सुमारे 40 एकर जागेवर मोठा मंडप टाकण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, भगतसिंग स्मारकासमोर तीन मोठे स्टेज बांधण्यात आले आहेत. मुख्य मंचावर शपथ ग्रहण सोदळा संपन्न होणार आहे. तर दुसऱ्या मंचावर नवनिर्वाचित आमदार आणि तिसऱ्या मंचावर अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षाचे इतर बडे नेते उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षांच्या एकाही नेत्याला निमंत्रित करण्यात आलेले नाही.


मान यांच्या शपथविधी कार्यक्रमात हेलिपॅड आणि 25 हजार वाहनांच्या पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमात कोणताही गडबड होऊ नये, यासाठी प्रत्येक टप्प्यावर दहा हजार पंजाब पोलीस तैनात करण्यात आले आहेत.


दरम्यान, या शपथ ग्रहण सोहळ्यावरुन दिल्लीतील भाजपचे आमदार परवेश वर्मा यांनी आम आदमी पार्टीवर टीका केली आहे. पर्यायी राजकारणाच्या नावाखाली आपचे जाहिरातींचे राजकारण वाढत आहे. 57 लाखांच्या रोड शोनंतर, आप ने शपथविधी सोहळ्यासाठी सरकारी तिजोरीतून 2 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याचे वर्मा म्हणालेत. या शपथविधी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भगवंत मान यांनी केले आहे. 


फक्त मीच नाही तर पंजाबचे तीन कोटी लोकही माझ्यासोबत शपथ घेतील. भगतसिंगांची स्वप्ने आपण सर्वांनी मिळून पूर्ण करायची आहेत. 16 मार्चला आपण त्यांची विचारसरणी अंमलात आणू. मी एकटाच मुख्यमंत्री झालो नाही. तुम्ही सगळे मुख्यमंत्री झालात. आता तुमचेच सरकार असेल असेही भगवंत मान म्हणालेत.आम आदमी पक्षाने 117 सदस्यीय पंजाब विधानसभेत 92 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: