Ashok Gehlot on Kapil Sibal: पाच राज्यात विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा मोठा परभव झाला आहे. त्यानंतर काँग्रेसच्या नेृत्वावर टीका होताना दिसत आहे. तसेच पक्षातील नेतेदेखील नेतृत्व बदलाची मागणी करत असल्याचे चित्र दिसत आहे. गांधी घराण्याविरोधात आवाज उठू लागला आहे. काँग्रेस विचारमंथन करुन पराभवाची कारणं शोधण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यावरुन पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सिब्बल यांच्या वक्तव्यानंतर गांधी कुटुंबाच्या बचावासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत पुढे आले आहेत. गेहलोत यांनी कपिल सिब्बल यांच्यावर निशाणा साधला आहे. कपिल सिब्बल यांना काँग्रेसची एबीसीडी माहीत नसल्याचा टोला अशोक गेहलोत यांनी लगावलाय.
सिब्बल यांच्या तोंडून असे शब्द बाहेर पडणे दुर्दैवी
सर्व काही सोनिया गांधींच्या आशीर्वादानेच मिळाले आहे. कपिल सिब्बल यांच्या तोंडून असे शब्द बाहेर पडणे दुर्दैवी असल्याचे गेहलोत यांनी म्हटले आहे. त्यांना काँग्रेसची ABCD माहीत नाही. काँग्रेसला एकसंध ठेवायचे असेल तर गांधी घराण्याच्या नेतृत्वाखालीच एकसंध ठेवू शकतो. हे प्रत्येक जात, प्रत्येक वर्ग, प्रत्येक धर्म, प्रत्येक भाषा, प्रत्येक प्रदेशातील लोक मग ते दक्षिण, पूर्व, पश्चिम किंवा उत्तरेतील असो सर्वांनाचं हे वाटत असल्याचे गेहलोत यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले कपिल सिब्बल?
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. निवडणुकीतील पराभवानंतर ते म्हणाले आहेत की, गांधी घराण्याने पद सोडावे आणि दुसऱ्या नेत्याला संधी द्यावी. तुम्हाला जर पराभवाची कारणे माहीत नसतील, तर तुम्ही कल्पनालोकात जगात आहात, असे ते म्हणाले आहेत. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असे म्हटले होते. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवामुळे मला आश्चर्य वाटले नाही.सीडब्ल्यूसीच्या बाहेरही काँग्रेस आहे. तुम्हाला हवे असल्यास त्यांचे मत ऐका. आमच्यासारखे अनेक नेते आहेत, जे सीडब्ल्यूसीमध्ये नाहीत. पण त्यांचा दृष्टीकोन पूर्णपणे वेगळा असल्याचे ते म्हणाले होते.
दरम्यान, आज संध्याकाळी 5 वाजता काँग्रेसच्या G-23 नेत्यांची मोठी बैठक होणार आहे. दिल्लीतील कपिल सिब्बल यांच्या घरी काँग्रेस नेते एकत्र येणार आहेत. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गमावलेल्या राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: