Yogi Adityanath Oath Ceremony : योगी आदित्यनाथ यांची विधीमंडळ नेतेपदी निवड, शुक्रवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळही ठरले
Yogi Adityanath Oath Ceremony : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांच्या पर्वाला सुरुवात होणार आहे. 25 मार्च रोजी योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
Yogi Adityanath Oath Ceremony : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांच्या पर्वाला सुरुवात होणार आहे. 25 मार्च रोजी योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी गुरुवारी योगी आदित्यनाथ यांची एकमताने विधीमंडळ नेतेपदी निवड झाली. त्यानंतर भाजपचे नेत्यांनी राज्यपाल यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. 25 मार्च रोजी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
सत्तास्थापनेचा दावा –
योगी आदित्यनाथ यांची विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर भाजप नेत्यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. राज्यपालांना भेटण्यासाठी भाजपकडून केशव प्रसाद मौर्य, रघुबर दास आणि उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह राजभवनात गेले होते.
Lucknow | BJP's Yogi Adityanath elected as the Leader of the Legislative Party in Uttar Pradesh. pic.twitter.com/OocpizW9Pi
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 24, 2022
मंत्रिमंडळही ठरले -
योगी आदित्यनाथ यांचे मंत्रिमंडळही जवळपास निश्चित झाले आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या चर्चेनंतर मंत्रिमंडळातील नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. सुत्रांच्या वृत्तानुसार, यावेळी योगींच्या मंत्रिमंडळात अनेक महिला मंत्री असण्याची शक्यता आहे. तसेच अनेक तरुणांना संधी मिळण्याची शक्यता आहे. केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून कामकाज सांभाळू शकतात. महेंद्र सिंह, असीम अरुण, राजेश्वर सिंह आणि स्वतंत्र देव सिंह यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेले खास व्यक्ती
इकाना स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. मोदी यांच्याबरोबर अनेक दिग्गज नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. कोण कोणते नेते उपस्थित राहणार ते पाहुयात...
पंतप्रधान नरेंद्र मोदी
गृहमंत्री अमित शाह
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा
केंद्र सरकारचे मंत्री
भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि संघाचे वरिष्ठ पदाधिकारी
प्रसिद्ध उद्योगपती आणि धार्मिक नेत्यांनाही आमंत्रित केलं आहे
एवढेच नाही तर या शपथविधी सोहळ्यात देशातील नामवंत उद्योगपती आणि धार्मिक नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. या सर्वांशिवाय यावेळी भाजपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांनाही या सोहळ्यासाठी बोलावण्यात आले आहे.
विरोधी पक्षनेत्यांनाही आमंत्रण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती, समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांच्यासह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही शपथविधी कार्यक्रमाला आमंत्रीत केले जाणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha