(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPS Amit Lodha: IPS अमित लोढा यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, 'खाकी' वेब सीरिजमुळे आहेत चर्चेत
IPS Amit Lodha: बिहारच्या दक्षता विभागाने आयपीएस अमित लोढा यांच्याविरोधात बिहारच्या विशेष दक्षता पथकाने गुन्हा दाखल केला आहे.
IPS Amit Lodha: बिहारच्या विशेष दक्षता विभागाने आयपीएस अधिकारी अमित लोढा (Bihar IPS Officer Amit Lodha) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नेटफ्लिक्सवरील (Netflix) खाकी: द बिहार चॅप्टर (Khakee The Bihar Chapter) ही वेब सीरिज (Web Series) चर्चेत आहे. अमित लोढा यांनी लिहिलेल्या पुस्तकावर ही वेब सीरिज बेतली आहे. शासकीय सेवेत असताना नेटफ्लिक्स आणि फ्रायडे स्टोरी टेलर (Friday Storytellers) या कंपन्यांसोबत व्यावसायिक करार केल्याचे आढळून आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिहार पोलीस दलाचे महानिरीक्षक पदाची जबाबदारी सांभाळलेल्या अमित लोढा यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा बिहार डायरी या पुस्तकावर आधारीत असलेल्या वेब सीरिजमुळे लावण्यात आला आहे.
बिहारच्या विशेष दक्षता विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मगध विभागाचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक अमित लोढा यांच्याविरोधात भ्रष्टाचार, वैयक्तित स्वार्थ आणि लाभासाठी आर्थिक अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्याचे निवेदन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले होते. त्याशिवाय, नेटफ्लिक्स आणि फ्रायडे स्टोरी टेलरसोबतच्या व्यावसायिक संबंधांची चौकशी करण्यात येणार असल्याचे विशेष दक्षता पथकाने म्हटले.
अमित लोढा हे अजूनही शासकीय सेवेत कार्यरत असून ते व्यावसायिक लेखक नाहीत. एखाद्या निर्मिती संस्थेशी, कंपनीसोबत वेब सीरिजसाठी करार करू शकत नाही. अमित लोढा यांनी करारातून 12 हजार 372 रुपये मिळाले असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या पत्नी कौमिदी यांच्या खात्यावर 38.25 लाख रुपये जमा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. बेकायदेशीर करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहाराला कायदेशीर करण्यासाठी निर्माते आणि कौमिदी यांच्यात व्यवहार झाला असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
तपासा दरम्यान समोर आलेले तथ्य आणि पुरावे यांच्याआधारे अमित लोढा यांच्याविरोधात विशेष दक्षता पथकाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलम U/S13(1)(b)r/w13(2)r/w12, आणि भादंवि कलम 120b, 168 नुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
अमित लोढा कोण आहेत? (Who is Amit Lodha)
अमित लोढा यांनी वयाच्या 25 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. भारतीय पोलीस दलात निवड झाल्यानंतर त्यांना बिहार कॅडर मिळाले. अमित लोढा हे 1998 च्या बॅचचे अधिकारी आहेत. 'बिहार डायरी' हे पुस्तक त्यांनी आपल्या कारकिर्दीत आलेले अनुभव व्यक्त केले आहेत. अमित लोढा हे मुळचे राजस्थानमधील आहेत. बिहारमध्ये कर्तव्यावर रुजू झाल्यानंतर त्यांनी नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. कोणतीही तक्रार असली तरी थेट मलाच फोन करा, असे त्यांनी नागरिकांना म्हटले होते. नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यावर भर दिल्याने ते लोकप्रिय अधिकारी झाले होते. नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजमुळे आणखीच प्रकाशझोतात आले.