(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bihar Congress : मंत्रीपदावरुन काँग्रेसमध्ये वाद, सन्मानजनक मंत्रीपदं मिळावेत अन्यथा..., काँग्रेसची थेट धमकी
बिहारच्या नव्या मंत्रिमंडळात सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजेत अशी मागणी बिहार काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे.
पाटना: बिहारमध्ये महागठबंधनचे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता अंतर्गत कुरघोडी समोर येऊ लागल्या आहेत. नव्या सरकारमध्ये आम्हाला सन्मानजनक जागा मिळाव्यात, अन्यथा सहन केले जाणार नाही अशी थेट धमकीच काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे. नव्या सरकारची अजून फ्लोअर टेस्ट झाली नाही, तरीही काँग्रेसमध्ये आता मंत्रीपदावरून कुरघोडी सुरू झाल्या आहेत.
बिहारमध्ये नितीश कुमार यांनी एनडीएतून बाहेर पडून राजदसोबत घरोबा केला आणि नवीन समिकरण जुळून आलं. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राजदच्या तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारच्या या महागठबंधनमध्ये काँग्रेसलाही सामावून घेतलं जाणार आहे. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये मंत्रिपदावरुन जोरदार लढाई सुरू असल्याचं दिसून येतंय. त्यावरुन बिहार काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले असून त्यांनी बिहार प्रभारी भक्त चरण दास यांच्याबद्दल अपशब्दही वापरल्याची माहिती आहे.
मंत्रिपदावरुन काँग्रेसच्या आमदारांनी आतापासूनच आक्रमक भूमिका घेतली असून जर मंत्रिमंडळात सन्मानजनक स्थान मिळालं नाही तर ते सहन केलं जाणार नाही अशी धमकीच दिली आहे.
बिहारच्या नव्या सरकारने 24 ऑगस्टला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या सरकारमध्ये 24 आणि 25 ऑगस्टला बिहार विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार असून 24 ऑगस्टला नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारची फ्लोअर टेस्ट होणार आहे.
दरम्यान, बिहारचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी तीन दिवसांपूर्वी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. या बैठकीनंतर तेजस्वी यादव म्हणाले की, बिहारमधील (Bihar) सत्ताबदलानंतर आज पहिल्यांदाच आम्ही आमच्या घटक पक्षांच्या शीर्ष नेतृत्वाची भेट घेतली आहे. सत्तापरिवर्तन झाल्यानंतर काल दिल्लीत आलो. डी.राजा (D Raja), सीताराम येचुरी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. सर्वांनी आमचे अभिनंदन केले. नितीश कुमारांच्या निर्णयाने भाजपला चपराक बसली आहे. यासाठी मी मुख्यमंत्री आणि सोनिया गांधी यांचे आभार मानतो. मी माझे वडील लालू प्रसाद यादव यांचेही आभार मानतो की, ते आयुष्यभर गरिबांसाठी लढले. घाबरवणे हे भाजपचे काम आहे. ज्यांना भीती वाटते त्यांना ते घाबरवतात आणि जे विकले जातात त्यांना विकत घेतात. ईडी, सीबीआय, आयकर यांसारख्या संस्थांची स्थिती पोलिसांपेक्षाही वाईट झाली आहे. भाजप अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरोचा वापर करून लोकांना घाबरवत आहे.