एक्स्प्लोर
क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम कालवश

नाशिक : क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम कालवश झाले आहेत. व्याख्यान देण्यासाठी गेले असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने भीष्मराज बाम यांचं निधन झालं. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा, मुलगा नरेंद्र आणि अजित असा परिवार आहे. क्रीडा मानसशास्त्रज्ञ म्हणून भीष्मराज बाम यांचं नाव क्रीडा क्षेत्रात अत्यंत आदराने घेतलं जातं. ऑलिम्पिकसह विविध क्रीडा स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणाऱ्या अनेक खेळाडूंना भीष्मराज बाम यांनी मार्गदर्शन केले आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अंजली भागवत, कविता राऊत, पी. गोपीचंद यांच्यासह अनेक खेळाडूंना भीष्मराज बाम हे मार्गदर्शक म्हणून लाभले. 'मार्ग यशाचा', 'संधीचं सोनं करणारी इच्छाशक्ती', 'विजयाचे मानसशास्त्र', 'मना सज्जना' यांसारखी पुस्तकंही भीष्मराज बाम यांनी लिहिली. या पुस्तकांचा हिंदी, पंजाबी आणि तामिळ भाषेतही अनुवाद झाला. याचबरोबर मराठीतील अनेक वृत्तपत्रांमध्ये बाम यांनी स्तंभलेखनही केले. 1963 साली महाराष्ट्र पोलिस सेवेत पोलिस उपाधीक्षक म्हणून ते रुजू झाले. 18 वर्षांच्या सेवेनंतर त्यांची गृहमंत्रालयात महत्त्वाच्या पदावर नेमणूक झाली. त्यानंतर पुढे ते पोलिस महानिरिक्षक म्हणून निवृत्त झाले. ‘दक्षता’ या पोलिस मासिकाचे ते दोन वर्षे मुख्य संपादकही होते. भीष्मराज बाम यांच्या अंत्यदर्शनासाठी पोलिस अधिकारी, खेळाडू आणि मान्यवरांची गर्दी झाली आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहे.
Before You Go
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप






















