मुंबई : राज्यात लॉकडाऊनचा परिणाम आता दिसायला लागला असून दिवसेंदिवस कोरोनाचा आलोख उतरणीला लागला आहे. राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज तब्बल 59 हजार 318 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर आज नवीन 34 हजार 389 कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान आज 974 कोरोना रुग्णांची मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


आजपर्यंत 48,26,371 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 4 लाख 68 हजार 109 सक्रीय रुग्ण आहेत. 



फॅमिली डॉक्टरांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रुप धारण केलं आहे. त्यामुळे ही लढाई आता मोठी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता फॅमिली डॉक्टरांना आवाहन केले आहे. कोविड विरुध्दची लढाई लढण्यासाठी "माझा डॉक्टर" म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या फॅमिली डॉक्टरांनी शासनासोबत यावे, कुटुंब प्रमुख म्हणून मी आज आपल्याला साद घालत आहे. या डॉक्टरांनी गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या उपचाराचे शिवधनुष्य उचलावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


मुख्यमंत्री म्हणाले, की आपल्या सगळ्यांना माहित आहे की जगभरात प्रत्येक घराचा एक स्वत:चा कुटुंबाचा डॉक्टर असतो. आपल्याला आपल्या त्या माझ्या डॉक्टरवर म्हणजे आपल्या फॅमिली डॉक्टरवर खुप विश्वास असतो. या डॉक्टरांनाही कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची, त्याच्या प्रकृतीची संपूर्ण माहिती असते, घरातल्या लोकांचे आजार माहित असतात.


आज मला तुमच्या या अनुभवाची गरज आहे, तुमच्या सहकार्याची आणि सेवेची गरज आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आजही 70 ते 75 टक्के रुग्णांमध्ये कोविडची लक्षणे दिसून येत नाहीत. ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत त्यांना आपण रुग्णालयात दाखल करून घेत नाहीत किंवा तसा सल्ला देत नाहीत. त्यांचा घरच्याघरी उपचार करतो, काहींना तर औषधांची गरज न पडता ते बरे होतात. एकीकडे ही स्थिती आहे तर दुसरीकडे आपल्या लक्षात येते की मृत्यूदर वाढतो आहे, मग त्याची कारणे शोधली तर पेशंट उशिरा रुग्णालयात दाखल होतात हे कारण प्रामुख्याने समोर येते. रुग्ण घरच्या घरी अंगावर काही गोष्टी काढतात आणि उशिरा रुग्णालयात दाखल होतात. मला यामध्ये तुम्हा सर्वांचे सहकार्य हवे आहे गृह विलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांचे उत्तम उपचार व्यवस्थापन होण्याची गरज यातून पुढे आली आहे.