Cyclone Tauktae : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर तोक्ते चक्रीवादळात झालं असून अतिशय रौद्र रुप धारण करत हे वादळ आता मुंबईनजीक येऊन पेहोचलं आहे. रविवारपर्यंत गोवा, रत्नागिरी आणि उर्वरित कोकण किनारपट्टीवर धुमाकूळ घातलेलं हे वादळ आता काहीसं पुढे सरकलं असून, सध्याच्या घडीला त्याचं केंद्र हे मुंबईच्या समुद्रसपाटीपासून 150 किमी समुद्री भागात असल्याचं सांगण्यात येत आहे. 


मुंबईला हे वादळ थेट धडकणार नसलं तरीही त्याचे थेट परिणाम मात्र शहरात दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. सध्याच्या घडीला मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोसाट्याचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे, तर काही भागांत मुसळधार ते मध्यम स्वरुपाच्या पावसालाही सुरुवात झाली आहे. पुढील चार - पाच तास मुंबईत अशीच परिस्थिती कायम राहणार असून, दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तोक्ते चक्रीवादळ मुंबईपासून पुढे उत्तरेकडे सरकणार आहे. पुढे गुजरात दिशेनं या वादळाचे परिणाम दिसण्यास सुरुवात होणार आहे. 


Cyclone Tauktae : मुंबईत 'तोक्ते' चक्रीवादळ धडकणार नसलं, तरीही त्याचे थेट परिणाम दिसण्यास सुरुवात 






तोक्ते चक्रीवादळाच्या परिणामार्थ वादळी वारे, समुद्राच्या उंच लाटा उसळणं अपेक्षित आहेत. तर रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघरमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस आणि घाट क्षेत्रात हलका ते मध्यम पाऊस (तुरळक मोठ्या सरी) असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांमुळे झाडे पडणे, खांब वाकणे, विजेच्या तारा पडणे, होर्डिंग्ज पडणे, पत्रे उडणे, कच्च्या भिंती पडणे आदी घटना घडू शकतात, याच पार्श्वभूमीवर नागरिक आणि पालिका प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 



पुढचे 12 तास या वादळाचा प्रभाव कायम राहणार असून, तासागणिक ते अधिक रौद्र रुप धारण करणार आहे. शिवाय वाऱ्याचा वेगही वाढताना दिसणार आहे.