Bhagat Singh Birth Anniversary : क्रांतिकारकांचा शिरोमणी असलेला भगतसिंग (Bhagat Singh) हा आजही देशातील तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. भगतसिंगला एक वैचारिक बैठक होती, त्याची एक स्वतंत्र विचारधारा होती, हे त्याचे वैशिष्ट्य आणि हिच गोष्ट त्याला इतर क्रांतिकारकांपासून वेगळी बनवते. देशाला केवळ स्वातंत्र्य मिळवून द्यायचं नाही तर त्यानंतर देशात एका समाजवादी समाजरचना निर्माण करायची आणि त्या आधारे गरिबातल्या गरीब व्यक्तीला आधार द्यायचा हे त्याचे स्वप्न. भगतसिंगचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे नास्तिकवादी विचार. हा विचार त्याने अगदी अखेरच्या श्वासापर्यंत जपला. आपली नास्तिकवादी भूमिका नेमकी काय आहे हे पटवून देण्यासाठी त्याने लाहोरच्या तुरुंगात असताना 'Why I am an Atheist' म्हणजे 'मी नास्तिक का आहे' या नावाने एक लेख लिहिला. हा लेख 27 सप्टेंबर 1931 रोजी लाहोरच्या 'द पीपल' या वृत्तपत्रात छापून आला. 


भगतसिंगचा देवावर विश्वास नाही हे समजल्यावर त्याच्यासोबत लाहोरच्या तुरुंगात असलेल्या बाबा रणधीर सिंहांनी यामागे त्याचा अहंकार असल्याचं सांगितलं. मग भगतसिंगने आपल्या नास्तिकवादाच्या मागची भूमिका पटवून देण्यासाठी हा लेख लिहिला. 


या लेखाच्या माध्यमातून भगतसिंगने देवाच्या अस्तित्वावर अनेक तर्कपूर्ण शंका उपस्थित केल्या. या विश्वाची निर्मिती, मनुष्याचा जन्म, त्याची ईश्वराबद्दलची कल्पना, मग त्यामुळे निर्माण होणारी त्याची दीनता, देवाच्या नावाने होणारे मनुष्याचे शोषण, अराजकता, वर्णभेद अशा अनेक गोष्टींचे भगतसिंगने विश्लेषण केलं आहे. भगतसिंगच्या एकूण साहित्यामधील त्याचा हा लेख मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिला आहे. 


भगतसिंगच्या 'मी नास्तिक का आहे' या लेखाचे भाषांतर...


"मी माझ्या अहंकारामुळे सर्वव्यापी आणि सर्वशक्तीमान  ईश्वरावर विश्वास ठेवत नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मी ईश्वराच्या अस्तित्वाला नाकारतोय, माझ्या अहंकारामुळे हा अविश्वास निर्माण झाला आहे या निष्कर्षापर्यंत माझे मित्र पोहोचले आहेत. मीही मनुष्य आहे, आणि मनुष्याच्या दुर्बलतेच्या वरती माझी शक्ती आहे अशी शेखी मी मिरवत नाही. अहंकार माझ्या स्वभावाचे एक अंग असलं तरी माझ्यातही काही कमतरता आहेत. मी निरंकुश सत्तावादी आहे आणि माझे विचार मी इतर सरकाऱ्यांवर थोपतो अशी तक्रार अनेक कॉम्रेड करतात. मी हे नाकारत नाही आणि याला अहंकार म्हटलं जाऊ शकतं. पण असंही म्हटलं जाऊ शकतं की हे आपल्या मतावर असलेला विश्वास असू शकतो. अहंकार म्हणजे स्वत:बद्दल विनाकारण असलेला गर्व होय. मग हा अहंकार मला नास्तिकवादाकडे घेऊन जातोय का? 


माझी नास्तिकवादाची भूमिका ही आताची नाही. मी ज्यावेळी सामान्य तरुण होतो तेव्हापासून मी देवावर विश्वास ठेवणं बंद केलं होतं. मी कॉलेजमध्ये असताना खूप हुशार असा विद्यार्थी नव्हतो. त्यामुळे त्यावेळी अहंकाराच्या भावनेच्या आहारी जाण्याची संधीच मिळाली नाही. मी एक साधा लाजाळू मुलगा होतो, ज्याची भविष्याकडे पाहण्याची दृष्टी काहीशी निराशावादी होती. माझ्या वडिलांचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे आणि ते आर्य समाजी होते. त्यामुळे त्यांचा देवावर विश्वास होता. ते मला रोज देवाची प्रार्थना करण्यासाठी प्रोत्साहित करायचे. नंतरच्या काळात मी क्रांतिकारी नेत्यांच्या सहवासात आलो. देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका असतानाही ते त्याला नाकारण्याचं धाडस दाखवत नव्हते. काकोरी कटातील सर्व चारही शहीदांनी आपल्या जीवनातील शेवटचे क्षण भजन-कीर्तनामध्ये व्यस्त केलं. 


सुरुवातीच्या काळात मी रोमॅन्टिक आदर्शवादी क्रांतिकारक होतो, दुसऱ्याचे अनुकरण करणारा. आता स्वत:च्या खांद्यावर जबाबदारी पेलण्याची वेळ आली होती. आपल्या विचारांना तर्क देण्यासाठी वाचन करणं आवश्यक होतं, मी ते सुरु केलं. बुकानिन, मार्क्स, लेनिन, ट्रॉस्की यांना वाचायला सुरु केलं. या सर्वांना त्यांच्या देशात क्रांती यशस्वी केली होती आणि हे सर्वजण नास्तिक होते. 1926 च्या शेवटापर्यंत मला हे समजून चुकलं की सर्वशक्तीमान, परमात्मा या सर्व गोष्टी मान्य करणं म्हणजे मुर्खपणा आहे. त्यानंतर मी नास्तिक झालो. 


मे 1927 मध्ये मला काकोरी कटातील क्रांतीकारकांना तुरुंगातून सोडवण्याच्या कटाची आखणी करत असल्याच्या आरोपाखाली अटक झाली. त्या एक महिन्याच्या काळात जेलमधील पोलीस अधिकारी मला रोज देवाची प्रार्थना करायला सांगायचा, पण मी नास्तिक होतो. चांगल्या आणि शांतीच्या काळात मी नास्तिक असल्याचं नाटक करतोय आणि अशा अडचणीच्या वेळी मी तो विचार सोडून देतोय का याची ती परीक्षा होती. 


या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर देवावर विश्वास ठेऊन पुढं जाणं हे माझ्या हातून होणार नाही हे निश्चित झालं. देवावरची श्रद्धा ही संकटाची आणि कष्टाची तीव्रता कमी करते. वादळ आणि तुफान येत असताना त्या विरोधात स्वत:चे पाय रोवून उभं राहणं हा काही पोरखेळ नाही. अशा कसोटीच्या क्षणी अहंकार, गर्व असेल तर त्याचं हरण होतं. 


निर्णय स्पष्ट आहे, एकाच आठवड्यात हे जाहीर होईल की मी माझं जीवन एका ध्येयासाठी त्याग करत आहे. एखादा हिंदू आपल्याला पुढच्या जन्मी राजाचा जन्म लाभावा किंवा मुस्लिम आणि ख्रिश्चन त्याला स्वर्गातील सुख मिळावं म्हणून प्रार्थना करत असेल. पण मग मी काय करु?  पण मला याची कल्पना आहे की ज्या क्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल तो क्षण माझ्या आयुष्यातील शेवटचा क्षण असेल. माझ्या आत्म्याचा तिथे अंत होईल, त्यापुढे काहीच नाही. विना कोणताही पुरस्कार किंवा अपेक्षा न बाळगता मी माझ्या देशासाठी जीवन समर्पित करत आहे. स्वत: वर विश्वास ठेवण्याच्या गुणाला नेहमी अहंकाराची संज्ञा दिली जाते आणि हे दु:खद आहे. 


पूर्वजांनी मनात ठासवलेल्या परमात्माच्या अस्तित्वाला जर कोणी आव्हान देत असेल तर त्याला धर्मविरोधी आणि अहंकारी म्हटलं जातं. पण मला नास्तिकवादाकडे घेऊन जाणारा माझा अहंकार नव्हता. 


केवळ विश्वास आणि अंधविश्वास हा धोकादायक आहे. तो मनुष्याला प्रतिक्रियावादी बनवतो. प्रचलित मतं ही तर्क-वितर्काच्या कसोटीवर आणि सत्यतेच्या आधारावर पडताळली पाहिजेत. जर तुमचा असा विश्वास असेल की निर्मात्याने ही सृष्टी बनवली तर त्याने ती का बनवली याचं उत्तर द्या. हे जग दु:खानं भरलं आहे, अनेकांना कष्टप्राय जीवन जगावं लागतंय. यावर आता असं म्हणू नका की हा निर्मात्याचा नियम आहे. जर तसं असेल तर तो सर्वशक्तीमान नाही. तो आपल्याप्रमाणेच नियमांचा गुलाम आहे. असंही म्हणू नका की हे निर्मात्यासाठी मनोरंजन आहे. निरोने आपल्या मनोरंजनासाठी केवळ एक रोम जाळलं होतं. चंगेज खानने त्याच्या आनंदासाठी हजारोंची हत्या केली होती. लोक त्यांना काय संबोधतात. मग देव यांच्यापेक्षा निर्दयी आहे का? की हे सर्व कष्ट करणाऱ्यांना सन्मान आणि चुका करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी होतंय? जर देवाने मनुष्याची निर्मिती आनंद घेण्यासाठी केली असेल तर त्याच्यात आणि निरोमध्ये काय फरक राहिला? 


हिंदू धर्मात आजच्या कष्टासाठी गत जन्मातील पाप कारणीभूत असल्याचं सांगण्यात येतंय. मनुष्याने काही पाप केल्यास त्याला कुत्रा, मांजर, गाढव अशा प्राण्यांच्या जन्माला जावं लागतं. 84 लक्ष योनीतून प्रवास केल्यानंतर त्याला मनुष्याचा जन्म मिळतोय. पण आपल्यातील एक तरी मनुष्य असा आहे का जो सांगू शकतो की त्याच्या पापामुळे तो गेल्या जन्मात गाढव होता? आता यावर पुराणातील कथांचा आधार मला सांगू नका, माझ्याकडे पुराण कथांना कोणतंही स्थान नाही. 


एखादा मनुष्याला पाप करण्यापासून तो सर्वशक्तीमान देव का थांबवू शकत नाही? त्याने युद्धपिपासू राजांना का नाही थांबवलं? असं केलं असतं तर अनेक युद्धं झालीच नसती. भारतावर असलेली इंग्रजांची सत्ता ही ईश्वराच्या कृपेने नाही तर त्यांना विरोध करण्याची आपल्याकडे ताकत नसल्याने आहे. इंग्रजांची सत्ता ही बंदूक, रायफल्स, बॉम्ब, पोलीस आणि लष्कराच्या आधारावर आहे. त्या आधारे ते इथल्या लोकांचे शोषण करत आहेत. मग कुठे आहे देव? तो या सर्व गोष्टींचा आनंद घेतोय का? 


आपण संकटात असताना देवाच्या कल्पनेचा उपयोग होतो. जर यावेळी मनुष्य स्वत:च्या पायावर उभा राहिला तर तो यथार्थवादी बनेल. आपल्यासमोरील सर्व संकटांचा सामना धैर्याने आणि परुषार्थाने करणं आवश्यक आहे. आज हीच माझी स्थिती आहे. याला माझे मित्र अहंकार असं नाव देतात. ही माझी विचार करण्याची पद्धत आहे ज्याला नास्तिकवादी म्हणता येईल. देवाची रोज प्रार्थना करणे हा मनुष्याचा स्वार्थ आहे. ज्या लोकांनी संकटाच्या वेळी बहादुरीने त्याला तोंड दिलंय, मी त्या लोकांपैकी आहे. 


एका मित्राने मला म्हटलं की मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात देवाची प्रार्थना करेन. मी त्याला म्हणालो की, तसं नाही होणार. जर मी शेवटच्या क्षणी देवाचा धावा केला तर मी स्वार्थी आणि भ्रष्ट होईन. स्वार्थ साधण्यासाठी मी देवाची भक्ती नाही करणार. वाचकांनो, हा माझा अहंकार आहे का? तसं असेल तर तो मी स्वीकारतो." 


संबंधित बातम्या :