9/11 US Attack : अमेरिकेच्या इतिहासात 11 सप्टेंबर ही तारीख कुणीही विसरु शकणार नाही. 11 सप्टेंबर 2001 रोजी अल कायदा या दहशतवादी गटाने केलेल्या हल्ल्यात न्यूयॉर्कमधील ट्विन टॉवर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन गगनचुंबी इमारती, ज्या अमेरिकेच्या वैभवाची साक्ष होत्या, त्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. त्यामध्ये 2977 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यावेळच्या एकमेव महासत्ता असलेल्या अमेरिकेवर इतका मोठा हल्ला हा जगातील अनेक देशांच्या सुरक्षेची चिंता वाढवणारा होता. 


या हल्ल्यानंतर अमेरिकेने जागतिक दहशतवादाविरोधात युद्ध पुकारलं आणि जगाच्या राजकारणाने वेगळं वळण घेतलं. 2011 साली त्यांनी या हल्ल्याला कारणीभूत असलेल्या लादेनला ठेचलं. अमेरिकेवर झालेल्या या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याला आज 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. 


विमानं हायजॅक करुन ट्विन टॉवरवर हल्ला
अमेरिकेवरील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यामागे अल कायदाच्या ओसामा बिन लादेनचा हात होता. अल कायदाने दोन विमानं हायजॅक करुन या ट्विन टॉवरवर एका मागोमाग एक अशी धडकवली होती. त्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने ओसामा बिन लादेनला पकडण्यासाठी कोट्यवधी डॉलर्सचा इनाम ठेवला. त्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला करुन तालिबानी शासन व्यवस्था उलथवून टाकली. पण यामध्ये ओसामा बिन लादेन अमेरिकेच्या हाताला काही लागला नाही. 


त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी अमेरिकेला ओसामा बिन लादेनचा ठिकाणा सापडला. लादेन पाकिस्तानमध्ये अबोटाबाद येथे लपून बसला होता. अमेरिकन लष्कराने एका सीक्रेट मिशनच्या माध्यमातून लादेनला पाकिस्तानात जाऊन ठेचलं. 


एकेकाळी अमेरिकेनेच रशियाविरोधात उभा केलेला भस्मासूर त्यांच्यावरच उलटला आणि अमेरिकेची नाचक्की झाली. अमेरिकेवरील या हल्ल्याला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. पण अजूनही जगातला दहशतवाद संपला नसून तो वेगवेगळ्या स्वरूपातून समोर येतोय. 


महत्वाच्या बातम्या :