मुंबई : येत्या 1 ऑक्टोबरपासून बँकेचे अनेक नियम बदलणार आहेत. या बदलाचा ग्राहकांच्या खिशावरही परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, बँकेचे कोणते नियम बदलतील हे जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. जर ग्राहकांना या नियमांची माहिती असेल तर त्यांना बँकेत कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे येत्या 1 ऑक्टोबरपासून नेमके कोणते नियम बदलणार आहेत, याची माहिती आज घेऊयात. 


पेन्शनचे नियम बदलणार


डिजिटल लाइफ सर्टिफिकेटशी संबंधित नियम 1 ऑक्टोबरपासून बदलतील. आता देशातील सर्व वृद्ध निवृत्ती वेतनधारक ज्यांचे वय 80 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे ते देशातील सर्व मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये लाईफ सर्टिफिकेट सादर करू शकतात. वृद्ध निवृत्ती वेतनधारकांना मुख्य पोस्ट ऑफिसच्या जीवन प्रदान केंद्रात डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करावे लागतील. या कामासाठी ज्येष्ठांना 30 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आली आहे.


वृद्धांसाठी लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याचे काम ऑक्टोबरपासून पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुरू होईल. भारतीय टपाल खात्याला असे निर्देश देण्यात आले आहेत की, जीवनप्रदान केंद्राचा आयडी बंद असेल तर तो वेळेत सक्रिय करा जेणेकरून वृद्ध निवृत्ती वेतनधारकांना कोणत्याही प्रकारे कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही.


'या' बँकांमध्ये जुने चेकबुक बंद होणार


1 ऑक्टोबरपासून तीन बँकांचे चेकबुक आणि एमआयसीआर कोड आपोआप अवैध ठरतील. या तीन बँकांमध्ये युनायटेड बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि अलाहाबाद बँक यांचा समावेश आहे. या बँकांचे अलीकडेच विलीनीकरण इतर बँकांमध्ये झाले आहे. विलीनीकरणामुळे खातेधारकांच्या खाते क्रमांक, IFSC आणि MICR कोडमध्ये बदल झाला आहे. या कारणास्तव, 1 ऑक्टोबर 2021 पासून बँकिंग प्रणाली जुने चेकबुक नाकारेल.


ऑटो डेबिटचे नियम बदलतील


क्रेडिट/डेबिट कार्डावरून ऑटो डेबिटसाटी 1 ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बँकेचे नवीन लागू केले जात आहेत. या नियमानुसार, ग्राहकाने मंजुरी दिल्याशिवाय ऑटो डेबिट होणार नाही. 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होणाऱ्या नवीन नियमानुसार, बँकेला कोणत्याही ऑटो डेबिट पेमेंटसाठी ग्राहकांना 24 तास अगोदर सूचना द्यावी लागेल. ग्राहकाच्या खात्यातून पैसे कन्फर्म झाल्यावरच डेबिट केले जातील. ही अधिसूचना ग्राहकांना एसएमएस किंवा ई-मेलद्वारेही पाठवली जाईल.