एक्स्प्लोर
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाच दिवस बँका बंद
बँक कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात हा संप पुकारला जात आहे. बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन बँक कर्मचार्यांकडून सरकारला धारेवर धरण्यात येणार आहे. तसेच या संपावेळी कर्मचार्यांच्या वेतनवाढीचा मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे.

नवी दिल्ली : डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बँक कर्मचारी संपावर जाणार असल्याने पाच दिवस बँकां बंद राहणार आहेत. त्यामुळे 21 तारखेच्या आत बँकेतील व्यवहार आटोपून घ्यावी लागणार आहे. बँक कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 21 डिसेंबरपासून संपावर जाणार आहेत. ख्रिसमस आणि वर्षअखेरीस फिरायला जाणाऱ्यांना 21 तारखेपूर्वीच पैशांची तजवीज करावी लागणार आहे. पाच दिवस बँका बंद राहणार असल्याने चेक क्लिअरन्स होण्यासही वेळ लागणार आहे. एटीएममध्येही पैशांची कमतरता भासू शकते. बँक कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात हा संप पुकारला जात आहे. बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन बँक कर्मचार्यांकडून सरकारला धारेवर धरण्यात येणार आहे. तसेच या संपावेळी कर्मचार्यांच्या वेतनवाढीचा मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे. 21 डिसेंबरला शुक्रवार असून याच दिवसापासून बँकांनी संपाची घोषणा केली आहे. 22 आणि 23 डिसेंबरला चौथा शनिवार, रविवार असल्याने बँकांना सुट्टीच आहे. तर 24 डिसेंबरला सोमवारी बँका उघडतील, परंतु या दिवशी बँकेत गर्दी होण्याची शक्यता आहे. तर 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी असल्याने बँका पुन्हा बंद राहतील. नॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ बँक वर्करचे उपाध्यक्ष अश्वनी राणा म्हणाले की, देशभरात 10 लाख बँक कर्मचारी आहेत. बँक युनियन या संपाद्वारे केंद्र सरकारकडे 25 टक्के वेतनवाढीची मागणी करणार आहे.
आणखी वाचा























