Bangladesh Violence : बांगलादेशात (Bangladesh News) सध्या प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. आरक्षणाबाबतचं आंदोलन चिघळलं, त्यानंतर सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं. पुढे आंदोलन एवढं चिघळलं की, शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. राजीनामा देऊन काही वेळातच शेख हसीना यांनी देश सोडून पलायन केलं. सध्या शेख हसीना कुठे आहेत? त्यांना कुणी आश्रय दिलाय? याबाबत कोणाला, काहीच माहिती नाही. 


बांगलादेशात आरक्षणावरून झालेल्या हिंसाचार आणि विरोधानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. सरकार पडल्यानंतर हसीना भारतात आल्या. मात्र, त्यांनी ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितला आहे. जोपर्यंत हसीना यांना ब्रिटनमध्ये आश्रय मिळत नाही, तोपर्यंत शेख हसीना भारतातच राहणार आहेत. सोमवारी त्यांचं सरकार पडल्यानंतर भारत सरकारनं त्यांना अंतरिम स्थलांतराची परवानगी दिली आहे. मात्र, अशा संकटातून वाचण्यासाठी शेख हसीना भारतात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला होता. 


कुटुंबाच्या हत्येनंतर बचावलेल्या शेख हसीना भारतात आश्रयाला


शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान पदावरुन पायउतार झाल्या, त्यांनी भारताकडे मदत मागितली आणि भारतानं मदत देऊ केलीही. पण यापूर्वीही संकटकाळी भारत शेख हसीना यांच्या मदतीसाठी पुढे आला होता. यापूर्वी 1975 मध्ये शेख हसीना आणि त्यांच्या बहिणीनं भारतात आश्रय घेतला होता. त्यानंतर त्या तब्बल 6 वर्षे दिल्लीत राहिल्या होत्या. 15 ऑगस्ट 1975 रोजी शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांची त्यांच्या घरी हत्या करण्यात आली. त्या दिवशी शेख हसीना यांच्या कुटुंबातील 17 जणांची हत्या करण्यात आली होती. मात्र, शेख हसीना आणि त्यांची बहीण त्यावेळी जर्मनीत असल्यानं त्यांचा जीव वाचला होता.


इंदिरा गांधी सरकारनं दिला राजकीय आश्रय 


संकटात सापडलेल्या शेख हसीना आणि त्यांच्या बहिणीला तत्कालीन इंदिरा गांधी सरकारनं भारतात राजकीय आश्रय दिला होता. त्यानंतर त्या तब्बल 6 वर्ष दिल्लीत राहिल्या. कालांतरानं परिस्थिती सामान्य झाल्यावर शेख हसीना यांनी बांगलादेशात परतण्याचा निर्णय घेतला. पुढे बांगलादेशात येऊन वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा निर्णय घेतला आणि शेख हसीना आपल्या बहिणीसोबत बांगलादेशात आल्या. 


शेख हसीना 1981 मध्ये बांगलादेशला परतल्या


शेख हसीना यांची 16 फेब्रुवारी 1981 रोजी अवामी लीगच्या अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर त्या मे 1981 मध्ये भारतातून बांगलादेशात पोहोचल्या. इथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची नवी सुरुवात झाली. मात्र, 1980चं दशक त्यांच्यासाठी चांगलं नव्हतं. त्यांना वेगवेगळ्या आरोपांखाली कोठडीत डांबण्यात आलं होतं. नोव्हेंबर 1984 पर्यंत त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. एवढं सगळं होऊनही शेख हसीना यांनी पराभव स्वीकारला नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली अवामी लीगनं 1986 मध्ये निवडणुकीत भाग घेतला. शेख हसीना यांची संसदेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली.


1996 मध्ये शेख हसीना पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या. 2001 पर्यंत त्यांची सत्ता होती. त्यानंतर 2008 मध्ये त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या. त्यानंतर 2014, 2018 आणि 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकून त्यांनी पंतप्रधानपद स्वतःकडे ठेवलं. 


बांगलादेशात आरक्षणावरून हिंसाचार 


आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बांगलादेशमध्ये हिंसाचार उसळला. या हिंसाचारात आतापर्यंत 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा आरक्षणाचा निर्णय बदलला, असं असूनही बांगलादेशात हिंसाचार आणि निदर्शनं थांबलेली नाहीत. शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांनी ढाका येथे मोर्चाही काढला. 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


कुणी नेसल्या साड्या, तर कुणाच्या हातात ब्लाऊज; बकरी, मासे अन् बरंच काही; आंदोलकांनी लुटलं शेख हसीनांचं घर