Bandipora Terrorist Attack:  जम्मू-काश्मीरमध्ये बांदीपोरामध्ये शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी ठार झाले होते. त्यातील एका शहीद पोलिसाच्या मुलीचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओ व्हायरल होत असून पोलिसांनी दहशतवाद्यांना धडा शिकवणार असल्याचे म्हटले आहे. 


व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील लहान मुलगी ही जम्मू-काश्मीरमधील पोलीस अधिकारी मोहम्मद सुल्तान यांची मुलगी आहे. बांदीपुरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तिने आपल्या वडिलांना गमावले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या मुलीचा 23 सेकंदाचा व्हिडिओ ट्वीट करत म्हटले की, आम्ही या कुटुंबासोबत आहोत. ज्या दहशतवाद्यांनी या मुलीला अनाथ केले त्यांना आम्ही सोडणार नसल्याचे पोलिसांनी म्हटले. 


शुक्रवारी काश्मीरमधील बांदीपोरा येथील गुलशन चौक परिसरात बाजारपेठेतील सुरक्षेसाठी पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते. यादरम्यान पोलिस दलावर अचानक दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये मोहम्मद सुलतान आणि फयाज अहमद हे दोन पोलिस शहीद झाले. गोळीबार केल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. 


या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि दहशतवाद्यांचा शोध सुरू केला, मात्र कोणताही सुगावा लागला नाही. परिसरात वेगाने शोधमोहीम राबविण्यात येत आहे. 


मागील काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. भारतीय सुरक्षा दलांकडून या दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. दहशतवाद्यांकडून पोलिसांनाही लक्ष्य केले जात आहे. मागील काही महिन्यात अनेक पोलीस दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha