नवी दिल्ली : जगभरात ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना सर्वच देशांनी खबरदारीचे उपाययोजना म्हणून नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचा आदेश देत आहेत. भारतातही अशा प्रकारचे आदेश सरकाकडून दिले गेले असले तरी भारतीय लोक याबाबत निष्काळजी वर्तन करताना दिसत आहेत. भारतात मास्कच्या वापरात घट होत असून ती चिंतेची बाब असल्याचं निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे. मास्कच्या वापरातील ही घट अत्यंत धोकादायक आणि अस्वीकाहार्य आहे असंही ते म्हणाले. मास्कचा वापर आणि लसीकरण हे कोरोनाविरोधातील लढाईसाठी गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. 


भारतातील नागरिक आता मास्कचा वापर करणे कमी करत आहेत. खासकरून ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनी मास्कचा वापर करणे कमी केलं आहे. ही गोष्ट चिंताजनक आहे. जगभरातली परिस्थिती पाहून तरी भारतीय लोकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचं व्हीके पॉल म्हणाले. 


 




काही दिवसापूर्वी LocalCircle या एनजीओने भारतात एक सर्व्हेक्षण केलं होतं. त्यामध्ये भारतातील तीन पैकी एकच नागरिक मास्कचा वापर करत आहेत असं समोर आलं आहे. देशातील केवळ दोनच टक्के लोकांनी सांगितलं की त्यांच्या परिसरातील लोक हे मास्कचा वापर आणि इतर कोरोनाच्या नियमांचे पालन करत आहेत. या संस्थेने एप्रिल महिन्यात पहिला सर्व्हे केला होता. त्यामध्ये देशभरातील 29 टक्के लोक मास्कचे पालन करत असल्याचं म्हटलं होतं. सप्टेंबरमध्ये ही आकडेवारी 12 टक्क्यांवर घसरली. 


देशात ओमायक्रॉनचे 26 रुग्ण
देशात गुरुवारपर्यंत ओमायक्रॉनचे एकूण 26 रुग्ण सापडले आहेत. तसेच सलग चौदाव्या दिवशी देशातील कोरोनाची रुग्णसंख्या ही दहा हजारांच्या आत आली आहे.  देशातील 53 टक्के प्रौढ लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाचे 131 डोस देण्यात आले आहेत.   


संबंधित बातम्या :