Ayushi Murder Case : देशभरात सध्या श्रद्धा वालकर हत्या (Shraddha Murder Case) प्रकरणाची चर्चा सुरु आहे. अशातच एक धक्कादायक घटना मथुरेतून समोर आली आहे. मथुरेत एका बापानं आपल्या पोटच्या पोरीचा खून करत तिचा मृतदेह बॅगमध्ये टाकून विल्हेवाट लावली. दिल्लीच्या बदरपूर भागात राहणाऱ्या या बापाने आपली मुलगी आयुषी यादवची गोळ्या झाडून हत्या केली. नंतर मथुरेच्या राया भागात तिचा मृतदेह लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये फेकून दिला.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय आयुषी काही न सांगता घरातून निघून गेली होती. 17 नोव्हेंबरला ती घरी पोहोचताच वडील नितेश यादव यांचा संयम सुटला आणि त्यांनी तिची गोळ्या झाडून हत्या केली. नंतर रात्री वडिलांनी मुलीचा मृतदेह एका लाल रंगाच्या ट्रॉलीत भरून राया भागातील यमुना एक्सप्रेस वेच्या सर्व्हिस रोडवर फेकून दिला. आयुषीचा मृतदेह मथुरेच्या राया परिसरात आढळून आला. १८ नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता मथुरा पोलिसांना मुलीचा बेवारस मृतदेह असल्याची माहिती मिळाली. मुलीच्या डोक्यावर, हातावर आणि पायावर जखमेच्या खुणा होत्या. तर डाव्या छातीत गोळी लागली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची 8 पथकं रवाना झाली आणि तपासानंतर जे समोर आलं ते अत्यंत धक्कादायक होतं. 
  
आयुषीची ओळख पटवण्यासाठी जवळपास 20 हजार फोन कॉल ट्रेस केले. मोबाईल फोन्सचे लोकेशन्स सर्विलंस टीमनं शोधले, सोबतच 210 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज चेक केले. तेव्हा पोलिस या मृतदेहाची ओळख पटवू शकले. 


या प्रकरणाचा तपास करण्यासाठी यूपी पोलिस  दिल्ली-एनसीआर, हाथरस आणि अलिगडसह आजूबाजूच्या परिसरात पोहोचली. सोबतच मृत मुलीची ओळख पटावी यासाठी तिचे पोस्टर्स देखील लावले होते. सोबतच तिचे फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केले होते. बरीच शोधाशोध केल्यानंतर हा मृतदेह आयुषी यादवचा असल्याचं समोर आलं.  


गोरखपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नितेश यादवचे कुटुंब सध्या गल्ली क्रमांक-65, गाव मोडबंद, पोलीस स्टेशन बदरपूर येथे राहते. माहिती मिळताच पोलिसांनी दोन पथके तातडीने रवाना करण्यात केली. पोलिसांना त्यावेळी घरात फक्त मुलीची आई आणि भाऊ दिसून आला, तर वडील बेपत्ता होते. त्यानंतर शोध सुरू केला असता बापाला ताब्यात घेतलं.  रात्री उशिरा चौकशीत वडिलांनी मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रासोबत मृतदेह लपवण्यासाठी वापरलेली कारही पोलिसांनी ताब्यात घेतली.


सध्या आयुषीचे वडील नितेश यादव यांची चौकशी सुरू आहे. सुरुवातीच्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार, आयुषी न सांगता घरातून निघून गेल्याचे समोर आले. ती घरी परतल्यावर संतापलेल्या वडिलांनी तिची गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर वडिलांनी रात्री स्वत:च्या कारमध्ये मृतदेह घेऊन यमुना एक्सप्रेस वेच्या बाजूला फेकून दिला. आता पोलीस आयुषीच्या हत्येमागील संपूर्ण कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 


18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास येथील कृषी संशोधन केंद्राजवळील झुडपात लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये रक्ताने माखलेल्या अवस्थेत आयुषीचा मृतदेह आढळून आला होता.  


ही बातमी देखील वाचा