Delhi Murder Case : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या ( Shraddha Murder Case ) प्रकरणामुळे सर्व देश हादरून गेला आहे. आरोपी आफताबने ( Aftab Amin Poonawalla ) त्याची गर्लफ्रेंड श्रद्धा वालकरचा ( Shraddha Walkar ) खून करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. हत्येला सहा महिने उलटून गेल्यामुळे पोलिसांसमोर पुरावे गोळा करण्याचं मोठं आव्हान आहे. या प्रकरणात आता पोलिसांना श्रद्धाच्या मृतदेहाचे आणखी दोन तुकडे सापडले आहेत. दिल्लीतील महरौलीच्या जंगलात पोलिसांना श्रद्धाच्या मृतदेहाचे दोन तुकडे सापडले असून ते आता फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी याआधी आफताबच्या फ्लॅटमधून आरोपी आफताब अमीन पूनावाला ( Aftab Poonawalla) आणि श्रद्धा वालकर यांचे कपडे जप्त केले आहेत आणि ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. 


श्रद्धाच्या मृतदेहाचे दोन तुकडे सापडले 


दिल्ली पोलीस श्रद्धाच्या मृतदेहाच्या शोधासाठी दिल्लीच्या जंगलात आणि इतर भागात शोधमोहीम राबवत आहेत. या प्रकरणात शनिवारी पोलिसांना काही प्रमाणात यश मिळालं आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे पोलिसांना सापडले आहेत. आरोपी आफताबने श्रद्धा वालकरचा निर्घूनपणे खून करत तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि ते विविध ठिकाणी फेकले. याआधी श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे सापडले आहेत. त्यानंतर आता आणखी पोलिसांना मृतदेहाचे दोन तुकडे सापडले आहेत. पोलिसांना अद्यापही श्रद्धाचं शीर सापडलेलं नाही. पोलिसांकडून या प्रकरणात कसून तपास सुरु आहे.


जंगलामध्ये पोलिसांची शोध मोहीम


शनिवारी पोलिसांनी पुन्हा श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांचा शोध घेण्यासाठी मेहरौलीच्या जंगलामध्ये शोधकार्य सुरू केले. यावेळी जंगलाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलीस तैनात करण्यात आले होते आणि कोणालाही आत जाऊ दिलं जात नव्हतं. या तपासादरम्यान दिल्ली पोलिसांना दोन हाडे सापडली असून ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. पोलिसांना अद्याप श्रद्धाचे डोकं सापडलेलं नाही. मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी दररोज अनेक पथके जंगलात शोधमोहीम राबवत आहेत.


हत्येला सहा महिने उलटून गेल्याने पुरावे गोळा करण्याचं आव्हान


आरोपी आफताबला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस पुरावे गोळा करण्यात गुंतले आहेत. हत्येला सहा महिने उलटून गेल्याने पुरावे गोळा करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. आफताबने मे महिन्यात श्रद्धाची हत्या केली. गेल्या काही दिवसांपासून पोलीस याबाबत आफताबची चौकशी करत आहेत, मात्र तो सातत्याने पोलिसांची दिशाभूल करत आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून त्याची नार्को टेस्ट करण्यात येणार आहे. 


सहा महिन्यांनंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कुजले


या प्रकरणाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागल्याने त्याचा योग्य प्रकारे तपास करण्याचा दबाव फॉरेन्सिक टीमवर आहे. त्यामुळे इतर देशातील बेस्ट टेक्निक आणि फॅसिलिटीची मदत घेतली जाऊ शकते. मे महिन्यामध्ये घडलेलं हे हत्याकांड आता समोर आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आरोपी आफताबने प्रेयसी श्रद्धा वालकरची हत्या केल्याची कबूली दिली आहे. मात्र हत्येला अनेक महिने उलटून गेल्यामुळे पोलीस आणि फॉरेन्सिक तपासावर सर्व प्रकरण अबलंबून आहे. त्यामुळे तपास करताना फॉरेन्सिक टीमचा कस लागणार
आहे.