Assam : आसाममधील बहुपत्नीत्व प्रथा लवकरच संपुष्टात येणार, सरकार कायदा करण्याच्या तयारीत; समितीकडून मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर
Assam Polygamy Bill : आसाममधील बहुपत्नीत्व प्रथा संपवण्यासाठी सरकार विधेयक आणणार आहे. यासाठी स्थापन केलेल्या समितीने त्यांचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे.
Assam CM Himanta Biswa Sarma : आसाममधील बहुपत्नीत्व प्रथा संपवण्यासाठी सरकार पाऊलं उचलत आहे. आसाममध्ये बहुपत्नीत्व संपवण्यासाठी सरकार कायदा करणार आहे. बहुपत्नीत्वाचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने रविवारी आपला अहवाल मुख्यमंत्री हिमंत बिसवा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्याकडे सादर केला आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर काही तासांतच मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रस्ताव मांडून बहुपत्नीत्व संपुष्टात आणण्यासाठी कायदा केला जाईल, अशी घोषणा केली आहे.
आसाममधील बहुपत्नीक प्रथा संपवण्यासाठी सरकारचं पाऊल
आसाममध्ये बहुपत्नीत्वावर बंदी घालण्यासाठीच्या शक्यता आणि बाबी यांचा शोध घेण्यासाठी आसाम सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने रविवारी मुख्यमंत्री हिमंता सरमा यांच्याकडे अहवाल दिला आहे. 12 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायमूर्ती रुमी कुमारी फुकन यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. या समितीमध्ये फुकन यांच्यासोबत महाधिवक्ता देवजीत सैकिया, वरिष्ठ अतिरिक्त महाधिवक्ता नलिन कोहली आणि वरिष्ठ अधिवक्ता नेकिबुर जमान यांचा समावेश आहे. 18 जुलै रोजी आसाम सरकारने या समितीची मुदत वाढवली होती. आता या तज्ज्ञ समितीने अहवाल दिला आहे.
बहुपत्नीत्व प्रथेवर बंदी आणण्यासाठी कायदा
तज्ज्ञ समितीला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. हा अहवाल आता मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला असल्याने, राज्य सरकार पुढील विधानसभा अधिवेशनात आसाममध्ये बहुपत्नीत्वावर बंदी घालणारा कायदा आणण्यासाठी पावले उचलू शकते. बहुपत्नीत्व निर्मूलनासाठी राज्य स्वतःचे कायदे करू शकते यावर समितीने एकमताने सहमती दर्शवली आहे. ते म्हणाले की, या अहवालात एकमताने म्हटले आहे की, राज्य सरकार बहुपत्नीत्वावर कायदा करू शकते.
मुख्यमंत्र्यांकडे तज्ज्ञ समितीचा अहवाल सादर
आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ''आसाममधील बहुपत्नीत्व संपुष्टात आणण्यासाठी कायदा करण्यासाठी तपासणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने आज आपला अहवाल सादर केला आहे. आसाम आता जात, पंथ किंवा धर्माचा विचार न करता महिला सक्षमीकरणासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या जवळ आहे.''
What is Polygamy : बहुपत्नीत्व प्रथा म्हणजे काय?
एखादा पुरुष एकापेक्षा अधिक महिलांसोबत विवाह करणे, याला बहुपत्नीत्व (Polygamy) प्रथा असं म्हणतात. मुस्लिम कायदा शरीयतच्या कलम 2 अंतर्गत मुस्लिम पुरुषांना याची कायदेशीररित्या परवानगी आहे. मात्र, भारतीय दंड संहितेच्या कलम 494 आणि 495 अंतर्गत मुस्लिम धर्मीयांव्यतिरिक्त इतर व्यक्तींसाठी हा गुन्हा मानला जातो.
आसामध्ये बहुपत्नीत्व प्रथा
आसाममधील बराक खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये आणि होजाई आणि जमुनामुखच्या मध्यवर्ती भागात बहुपत्नीत्व प्रथा पाळली जाते. दरम्यान, शिक्षित गटांमध्ये बहुपत्नीत्वाची प्रथा कमी आहे. आसाममध्ये मुस्लिम धर्मीयांव्यतिरिक्त हिंदू, ख्रिश्चन आणि इतर धर्मीयांकडून मुख्यता आदिवासी भागात बहुपत्नीत्व प्रथा आजही पाळली जाते.