नवी दिल्ली : "अन्वय नाईक यांची कंपनी सात वर्षांपासून आर्थिक अडचणीत होती. त्यामुळे अन्वय नाईक यांनी आपल्या आईची हत्या करुन मग आत्महत्या केली असावी," असा युक्तिवाद रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे वकील हरिश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. दरम्यान पोलीस तपासात मात्र अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद नाईक या दोघांच्या मृत्यूची नोंद आत्महत्या अशीच आहे.


अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (9 नोव्हेंबर) अर्णब गोस्वामी यांना तातडीचा दिलासा देण्यास नकार दिल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. त्यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी झाली.


अर्णब गोस्वामींच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी का? सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षांचा सवाल, अर्णबच्या पत्नी म्हणतात....


अन्वय नाईकांनी आईची हत्या करुन मग आत्महत्या केली असावी : हरिश साळवे
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान अर्णब गोस्वामी यांच्यावतीने युक्तिवाद करताना हरिश साळवे म्हणाले की, "अन्वय नाईक यांची कंपनी सात वर्षांपासून आर्थिक अडचणीत होती. त्यांनी आपल्या आईची हत्या करुन मग आत्महत्या केली, अशीही शंका आहे. अर्णब गोस्वामी यांनी सर्व वेंडर्सना नियमित पैसे दिले आहेत." तसंच हे प्रकरण पुन्हा सुरु करण्यासाठी नियमांचं पालन केलेलं नाही, असा आरोपही त्यांनी केला.


अर्णब गोस्वामींची सुटका केल्यास आभाळ कोसळणार नाही : हरिश साळवे
हरिश साळवे यांनीयावेळी अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्हीविरोधात नुकत्याच दाखल झालेल्या गुन्ह्यांचा दाखला दिला. ते म्हणाले की, "एकामागोमाग एक गुन्हे दाखल केले जात आहेत. हे प्रकरण गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरुन पुन्हा सुरु करण्यात आलं. दंडाधिकाऱ्यांना अर्णब गोस्वामी यांना वैयक्तिक बॉण्डवर सोडून द्यायला हवं होतं. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं पाहिजे." तसंच अर्णब गोस्वामी यांची सुटका केली तर आभाळ कोसळणार नाही," असंही साळवे म्हणाले.


मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी अर्णब गोस्वामी सर्वोच्च न्यायालयात


अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामींना अटक
पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 




Arnab Goswami | अर्णब गोस्वामी यांच्या पोलीस कोठडीबाबत गुरुवारी फैसला