मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटक प्रकरणात आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीही उडी घेतली आहे. यासंदर्भात राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करुन अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा आणि आरोग्यबाबत चिंता व्यक्त केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली आहे.


अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.


अर्णब गोस्वामी यांची अटक योग्य, महाराष्ट्र पोलिसांचे आभार; अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया


अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं काय? ज्यात अर्णब गोस्वामींना अटक झालीय!


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकार विरुद्ध राज्यपाल असं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी याआधी घेतलेल्या भूमिकांमुळे राज्य सरकार काहीसं अडचणीत आलं होतं. आता अर्णब गोस्वामी अटक प्रकरणात झालेल्या कारवाईवरुन राज्यपालांनी आता थेट गृहमंत्र्यांनाच फोन केला आणि अर्णब यांची सुरक्षा तसंच आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली. तसंच अर्णब यांना कुटुंबीयांशी बोलू द्यावं, भेटू द्यावं अशी सूचनाही केली.


महत्त्वाचं म्हणजे राज्यपालांनी यापूर्वीही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरुन चिंता व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी देशमुखांना फोन करुन त्यांच्या सुरक्षा आणि आरोग्याविषयी काळजी व्यक्त केली.


अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामींना अटक
पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही : अनिल देशमुख
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते की, "कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल. ही केस बंद झाली होती. अन्वय नाईक यांच्या पत्नीने कोर्टात अर्ज केला होता. त्यानंतर ही केस रिओपन करण्याची परवानगी कोर्टाने त्यांना दिली."


अर्णब यांनी कोठडीत मोबाईल फोन वापरला?
न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील नगरपालिका शाळेतील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. याचदरम्यान, न्यायालयीन कोठडीत असताना शुक्रवारी अर्णब गोस्वामी यांनी मोबाईल वापरल्याचे समोर आले आहे. यावेळी अर्णब गोस्वामी हे सोशल मीडियावर लाईव्ह असल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात, अर्णब गोस्वामी यांच्याकडे मोबाईल फोन कसा पोहोचला? याची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :