मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अर्णब गोस्वामींच्या अटेकवरुन महाराष्ट्र सरकार विरुद्ध भाजप अशी जुंपली आहे. अमित शाहांपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी अर्णब यांच्या अटकेचा निषेध केला आहे. तसंच महाराष्ट्रात ही अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. तर काहीजण अर्णब गोस्वामींवर करण्यात आलेल्या कारवाईचं स्वागत करत आहेत. कायद्यापुढे कोणीही मोठं नाही, कायदा सगळ्यांना सारखाच, असं म्हणत अर्णब यांच्यावर करण्यात आलेली कारवाई योग्य असल्याचं म्हटलं आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं काय?
अन्वय नाईक यांनी 5 मे 2018 रोजी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच ठिकाणी अन्वय यांच्या आई कुमुद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. अन्वय नाईक हे पेशाने आर्किटेक्ट होते. अन्वय हे कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे संचालक होते. अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांना आपल्या आत्महत्येला जबाबदार धरलं होतं.
अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. या कामाचे पैसे रिपब्लिकन टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांनी थकवलेय आणि त्यामुळं आपल्या पतीने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप अन्वय यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी केला आहे.
अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर पत्नी अक्षता यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांच्या विरोधात तक्रार दिली. अलिबाग पोलिसांनी याप्रकरणी कुठलीही कारवाई केली नाही असा आरोप देखील अक्षता यांनी केला होता. 5 मे 2020 रोजी अक्षता यांनी सोशल मीडियावर याप्रकरणी एक सविस्तर व्हिडीओ प्रसारित केला आणि आपल्या पतीच्या आत्महत्येला दोन वर्षांनंतर देखील न्याय मिळत नाही त्यामुळे न्याय देण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी केली होती.
आघाडी सरकार आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 26 मे 2020 रोजी सांगितलं की, अन्वय यांची मुलगी आज्ञा नाईक त्यांना भेटली . अर्णब गोस्वामींनी पैसे थकवल्यानं वडील आणि आजीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची रायगड पोलीस तपास करत नाहीत अशी तक्रार तिनं केली. त्यानंतर मी सीआयडीला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत, असं देशमुखांनी सांगितलं. त्यानंतर पुन्हा 3 ऑगस्टला अक्षता यांनी सोशल मीडियावर आणखीन एक व्हिडीओ प्रसारित केला.
अर्णब गोस्वामी माझ्या पती आणि सासूच्या आत्महत्येला जबाबदार आहे. आधीच्या सरकारनं ही केस दाबण्याचा प्रयत्न केला. मला अजूनही न्याय मिळाला नाहीय, असा आरोप करणारा व्हीडिओ त्यांनी पोस्ट केला. त्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर #JusticeForAnvay ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी झाले होते.
रिपब्लिक टीव्हीची बाजू
आज संपूर्ण देशात महाराष्ट्र पोलिसांची कारवाई पाहिली. सकाळी 7.45 वाजता रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या घरी महाराष्ट्र पोलीस घुसले. जबरदस्तीने कॅमेरे बंद केले. अर्णब गोस्वामी यांना धक्काबुक्की केली आणि घरातून फटफटत नेत पोलीस व्हॅनमध्ये बसवलं.
हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे. भारतातील एका वृत्तवाहिनीच्या संपादकाला केसांना पकडून फरफट नेऊन अटक केली जाते. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पोलिसांनी कॅमेरे बंद केले आणि अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली. सासू-सासऱ्यांना औषधं देण्यासही पोलिसांनी अर्णब यांना रोखलं. शिवाय त्यांच्या मुलालाही धक्काबुक्की केली. सोबतच त्यांनी लेखी कायदेशीर नोट रेकॉर्डवर ठेवण्यास परवानगी नाकारली. कोणत्याही पुराव्याशिवाय त्यांनी भारताच्या प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या संपादकाला ओढत नेलं, जसं की ते गुन्हेगार आहेत. अर्णब यांना आधी कोणतंही समन्स बजावलं नाही आणि कायदेशीर टीमला भेटूही दिलं नाही.
"मी काय करु शकतो हे तुला माहित नाही," असं पोलीस पथकाचे अधिकारी सचिन वझे अर्णब गोस्वामी यांना म्हणाले. मी सहकार्य करेन असं वारंवार सांगूनही कोणतीही प्रक्रिया न करता अर्णब गोस्वामी यांना क्राईम ब्रान्च युनिटकडे सोपवलं आणि त्यांना धक्काबुक्की केली.
सशस्त्र पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना धक्काबुक्की करुन पोलीस व्हॅनमध्ये ढकललं. अर्णब गोस्वामी म्हणाले की, "त्यांनी मला मारहाण केली. त्यांनी मला शारीरिक धक्काबुक्की केली. आमच्यासाठी लढा, असं मला भारताच्या लोकांना सांगायचं आहे. माझ्या मुलाला मारहाण केली."
मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार अधिकाराचा आणि वर्दीचा वापर करुन हल्ला करत आहे. हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय किंवा तथ्याशिवाय बंद झालेली केस पुन्हा ओपन करुन केवळ अर्णब गोस्वामी यांना वॉरंटशिवाय अटक करणं हे धक्कादायक आहे. भारत त्याविरोधात उभा राहणार आहे.
एन्काऊंटर कॉप आणि परमबीर सिंह यांचा उजवा हात असलेल्या सचिन वझे यांनी रिपब्लिक टीव्हीला सांगितलं की, "आयपीसीच्या कलम 306 अंतर्गत अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे." 2018 मधल्या एका आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी केली होती आणि कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर करुन असं काहीही घडलं नसल्याचं सांगितलं.
सत्तचे गैरवापर करणाऱ्या, कायदा पायदळी तुडवणाऱ्या आणि माध्यमांची गळचेपी करणाऱ्या महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांचा रिपब्लिक टीव्ही निषेध करते. फेक टीआरपी स्कॅमवरुन रिपब्लिक टीव्हीच्या न्यूजरुममध्ये पोहोचण्याची मुंबई पोलिसांची दुष्ट बाजू समोर आली. आता कोर्टाने बंद केलेल्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक धक्कादायक आहे.
आम्ही भारताच्या नागरिकांना, माननीय कोर्टाला आणि वरिष्ठ संस्थांना आवाहन करतो की, "त्यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रातील आणीबाणीविरोधात उभं राहिलं पाहिजे. या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन आम्ही करतो. रिपब्लिक मीडिया नेटवर्क शेवटपर्यंत लढत राहणार आहे आणि सत्याचा विजय होईल यात शंका नाही. सत्य कधीच पराभूत होत नाही."
गोस्वामींच्या अटकेचा एनबीएकडून निषेध
ज्या पद्धतीने अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली आहे, त्याचा एनबीएने निषेध केला आहे. NBA नं निवेदनात म्हटलं आहे की, रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोस्वामी यांना आत्महत्येप्रकरणी 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. एनबीए गोस्वामींच्या पत्रकारितेच्या शैलीचं, पद्धतीचं समर्थन करत नाही. मात्र ज्या पद्धतीनं त्यांना अटक झाली ते अयोग्य आहे. मीडिया कायद्यापेक्षा मोठा नाही, परंतु अटक करताना योग्य प्रक्रिया होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही अपील करतो की गोस्वामींना योग्य पद्धतीनं वागणूक मिळावी. प्रामाणिकपणाने आणि सरकारच्या शक्तीचा दुरुपयोग होऊ नये, असं एनबीएनं म्हटलं आहे.
संबंधित महत्त्वाच्या बातम्या :
- 'ही अघोषित आणीबाणी', अमित शाह, फडणवीसांसह भाजप नेते अर्णब गोस्वामींच्या समर्थनार्थ मैदानात
- कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, अर्णब गोस्वामींच्या अटकेवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
- Arnab Goswami Arrest | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक
- 'सोनियासेना किती तोंडं बंद करणार?', अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर कंगना
- महाराष्ट्रात कायद्याचं राज्य, आमच्याकडून चूक झाल्यास कायदा आम्हालाही सोडणार नाही : संजय राऊत
- 'महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार काम करतात', महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अर्णब गोस्वामींच्या अटकेचं स्वागत