मुंबई : काही लोकांसाठी वय हे केवळ एक नंबर असतो, त्यांनी ते वेळोवेळी सिद्धही केलं आहे. 89 वर्षाच्या चंद्रो तोमर उर्फ 'शूटर दादी' या अशाच लोकांपैकी एक. केवळ वय झालं म्हणून लोक अनेक गोष्टींपासून बाजूला होतात, त्या वयात चंद्रो तोमर दादीने शूटिंगमध्ये नाव कमावलं, अनेक मेडल कमावले आणि 'शूटर दादी' या नावाने प्रसिद्ध झाली. चंद्रो तोमर दादी भारतातील तरुणींसाठी प्रेरणास्थान आहे, खासकरुन अशा महिला आणि मुलींसाठी ज्यांना आजही पुरुषसत्ताक व्यवस्थेचा सामना करावा लागतोय, रुढी परंपरांच्या नावाखाली त्यांना अनेक अधिकारांपासून वंचित ठेवलं जातंय. पुरुषसत्ताक व्यवस्थेने आजही महिलांच्या पायात साखळ्या अडकवल्या आहेत आणि त्यांना या मोकळ्या आकाशात भरारी घेण्यापासून अटकाव केलाय. याच पुरुषसत्ताक व्यवस्थेचा वेध घेण्याचा प्रयत्न चंद्रो तोमर उर्फ शूटर दादीने केलाय. 


'द न्यूयॉर्क टाईम्स'मध्ये स्तंभ लिहणाऱ्या शालिनी वेणूगोपाल भगत यांनी चंद्रो तोमर दादीच्या जीवनावर 'An 89-Year-Old Sharpshooter Takes Aim at India’s Patriarchy' या नावाने एक लेख लिहलाय. त्या लिहतात की, एक 89 वर्षाची एक महिला तिच्या घराच्या अंगणात एक पिस्तूल घेऊन उभी आहे. गुलाबी रंगाच्या स्कार्फने तिचं डोकं आणि बाकी अंग जवळपास झाकलं आहे आणि तिचे हात एकदम स्थिर आहेत. ती 12 फूट समोर असलेल्या ध्येयावर आपलं लक्ष केंद्रीत करते आणि फायर करते, त्याचा अचूक वेध घेते. तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करायचं असतं, आपलं लक्ष विचलित करणाऱ्या आजूबाजूच्या गोष्टींना विसरून जायचं असं चंद्रो तोमर दादी म्हणते. 


चंद्रो तोमर दादी जरी टिपिकल आजीबाई वाटत असली तरी आजच्या घडीला ती जगातली सर्वात वृद्ध अशी शूटर आहे. तिने आतापर्यंत अनेक मेडल्स जिंकले आहेत. दादी स्त्रीवाद्यांसाठी आदर्श आहे आणि गेल्या 20 वर्षात तिने अनेक मुलींना शूटिंगमध्ये प्रशिक्षण दिलं आहे. चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर यांच्या जीवनावर 'सांड की ऑंख' नावाचा एक हिंदी चित्रपटही बनवण्यात आला आहे. 


चंद्रो तोमर दादीने वयाच्या 65 व्या वर्षी हातात पिस्तूल घेतली. पारंपरिक वेशभूषेतल्या या आजीबाईने व्यावसायिक शूटिंगच्या स्पर्धेत भाग घेतल्याचं पाहून शहरातील लोक सुरुवातीला तिच्यावर हसायचे, पण नंतर या लोकांचं हसणं दादीने शूटिंगमध्ये अचूक लक्ष साधून बंद केलं आहे. आतापर्यंत दादीने 25 पेक्षा जास्त मेडल जिंकले आहेत हे विशेष.


पारंपरिक रुढीचे जोखड ओढणाऱ्या समाजाने आणि कुटुंबातील पुरुष सदस्यांनी दादीच्या शूटिंग स्पर्धेत भाग घेणं, प्रवास करणं या गोष्टींना विरोध केला. पण दादी या सगळ्यांना पुरुन उरलीय. मला तरुण मुलींना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करायचं आहे असं दादी म्हणते. आज उत्तर प्रदेशमधील अनेक मुली या खेळात भाग घेतात पण 20 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती. 


दादीचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील जोहडी. आजही त्या गावात प्रचंड गरीबी आहे. 1999 साली या गावात पहिली शूटिंग रेंज उभारण्यात आली. चंद्रो तोमर दादी आपल्या नातीला या रेंजमध्ये घेऊन शिकवण्यासाठी भरती करायला गेली. एके दिवशी दादीने पिस्तूलमध्ये काडतूस घातले आणि निशाणा लावला. तो निशाणा अगदी अचूक लागला. त्यावेळी प्रशिक्षकाने सांगितलं की, दादी तुम्हीही शूटिंग शिकायला या. त्या दिवशी दादीची हिंमत आणि विश्वास वाढला आणि वयाच्या 65 व्या वर्षी तिच्या शूटिंगच्या प्रवासाला सुरुवात झाली. 


शूटिंगसाठी पिस्तूल हातात घेतल्याच्या दिवसापासूनच दादीने समाजातील पुरुषसत्ताक व्यवस्थेचा वेध घ्यायला सुरुवात केली, त्या व्यवस्थेला आव्हान द्यायला सुरुवात केली. उत्तर प्रदेशमध्ये महिलांचं काम केवळ मुलांना जन्म देणं, त्यांना वाढवणं आणि कुटुंबाचा सांभाळ करणं एवढंच आहे. कधी-कधी शेतात काम करणाऱ्या पुरुषांना जेवण देण्यासाठी घराबाहेर पडण्याची मूभा महिलांना दिली जाते. एक म्हातारी बाई हातात पिस्तूल घेते आणि स्पर्धेत भाग घेते त्यावर लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल असं सारखं दादीला ऐकावं लागायचं. मी हे सगळं शांतपणे ऐकायची, पण मनातून ठरवलं होतं की समाजाचा विचार न करता हे काम सुरूच ठेवायचं असं दादी सांगते.


मी ज्यावेळी पिस्तूल हातात घेते त्यावेळी माझे मन उत्साहित होतं असं दादी सांगते. आज चंद्रो तोमर दादी उत्तर प्रदेशातीलच नव्हे तर देशातील अशा अनेक मुलींना प्रेरणा देते ज्यांना परंपरेच्या नावाखाली दाबून ठेवलं जातंय. वयाच्या 89 व्या वर्षीही दादीला कोणताही चष्मा लागला नाही, तिचा वेधही अचूक आहे. याचे रहस्य काय आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. चंद्रो तोमर उर्फ शूटर दादीने परुषसत्ताक व्यवस्थेचा वेध घेतलाय हे नक्की. 



महत्वाच्या बातम्या :