दिल्ली : बंगळुरुहून (Banglore) दिल्लीला (Delhi) जाणाऱ्या एअर विस्ताराच्या (Air Vistara) विमानामध्ये उपस्थित असेलल्या डॉक्टरांच्या टीमने दोन वर्षांच्या चिमुकलीला जीवनदान दिलं. एअर विस्ताराच्या युके 814 ए या विमानात ही घटना घडली आहे. त्याच विमानात उपस्थित असेलल्या एम्सच्या (AIIMS) डॉक्टरांनी तात्काळ त्या चिमुकलीवर उपचार सुरु केले आणि तिला बरं केलं. दिल्लीच्या एम्सने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. हे सर्व डॉक्टर इंडियन सोसायटी फॉर व्हॅस्क्युलर अँड इंटरव्हेंशनल रेडिओलॉजीमधून दिल्लीसाठी रवाना झाले होते. दरम्यान या चिमुकलीला त्रास झाल्यानंतर तात्काळ या विमानात एमर्जन्सी जाहीर करण्यात आली.
नेमकं काय घडलं?
या दोन वर्षांच्या चिमुकलीवर इंट्राकार्डियाकची शस्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे ती बेशुद्ध होती आणि तिला सायनोसिसचा देखील त्रास होता. तिला उपचारांकरिता बाहेर घेऊन जाण्यात येत होते. पण विमानातच तिला त्रास व्हायला सुरुवात झाली. तिचे श्वास थांबले. तिचं शरीर थंड पडू लागलं. तिचे ओठ आणि बोटं देखील पांढरी पडू लागली. त्या विमानात उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी तिला विमानातच सीपीआर देण्यास सुरुवात केली. तात्काळ तिच्यावर उपचार केल्याने तिची रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत झाली.
एम्सचे अॅनेस्थेशिया स्पेशलिस्ट डॉ. नवदीप कौर, कार्डियक रेडिओलॉजिस्ट डॉ. दमनदीप सिंह, एम्सचे माजी रेडियोलॉजी स्पेशलिस्ट डॉ. ओइशिका आणि कार्डिअॅक रेडिओलॉजी स्पेशलिस्ट डॉ. अविनाश टक्सास हे उपस्थित होते. सुमारे 45 मिनिटे या चिमुकलीवर उपचार सुरु होते. तिला दुसरा कार्डिअॅक अटॅक आल्यामुळे तिच्यावर उपचार करणं थोडं कठीण होतं. पण डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि चिमुकलीचा जणू पुनर्जन्मच झाला.
नंतर या मुलीला नागपूरमध्ये आणण्यात आले आणि बालरोगतज्ज्ञांकडे तिला देण्यात आलं. एम्सच्या या डॉक्टरांचे करावे तेवढं कौतुक कमी आहे. कारण अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीला मरणाच्या दारातून परत आणण्यात हे डॉक्टर यशस्वी झाले. या चिमुकलीवर आता पुढील उपचार करण्यात येणार आहेत. डॉक्टरांच्या या कार्यामुळे तिला नवं आयुष्य मिळालं असल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा :
Vistara flight : दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्बची धमकी, सर्व प्रवाशांना सुखरुप खाली उतरवलं