नवी दिल्ली : बांगलादेशच्या (Bangladesh) पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) G-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात येणार आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांच्यात द्विपक्षीय बैठकही होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी बांगलादेशचे उप उच्चायुक्त अंदलिब इलियास यांनी सांगितले की, "पंतप्रधान शेख हसीना या 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या G-20 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तसेच पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान शेख हसीना यांच्यात द्विपक्षीय बैठक होण्याची देखील शक्यता आहे."


एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, "बांगलादेशचे उप उच्चायुक्त म्हणाले की, 'आम्हाला G-20 परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. आम्ही G-20 मध्ये सक्रिय सहभाग घेणार आहोत. तसेच यंदाच्या  G-20 परिषदेमुळे भारत एका उच्च स्थानी पोहोचला आहे.' 






विकसनशील देशांसाठी जी -20 महत्त्वाची


दरम्यान भारताच्या अध्यक्षतेखाली होणारी G-20 परिषद यशस्वी होणार असल्याचा विश्वास देखील बांगलादेशच्या उप उच्चायुक्तांनी व्यक्त केला आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, "बांगलादेश जरी G-20 परिषदेमध्ये सहभागी नसला तरी या परिषदेमधील सर्व निर्णयांचा विकसनशील देशांवर परिणाम होणार आहे. जेव्हा आमचा जवळचा मित्र एखाद्या परिषदेचं प्रतिनिधीत्व करतो तेव्हा आम्हालाही आनंदच होतो." 


9 सप्टेंबर रोजी परिषदेचं आयोजन


G-20 परिषद ही 9 आणि 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. भारतात तसेच दक्षिण आशियामध्ये होणारी ही पहिली परिषद आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी G-20 परिषदेमध्ये अध्यक्षपद भूषवणार आहेत. या परिषदेसाठी दिल्लीमध्ये तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. 


40 देश होणार G-20 परिषदेमध्ये होणार सहभागी


यावर बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, G-20 परिषदेसाठी भारत तयार असून अनेक देशांचे प्रमुख प्रतिनिधी हे या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीमध्ये येणार आहेत. तसेच 40 देश या G-20 परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमातून यासंदर्भात माहिती दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आता G-20 परिषदेची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. तसेच भारतात होणाऱ्या या परिषदेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. 


हेही वाचा : 


Mann Ki Baat Highlights: 'चांद्रयान मोहीम ही नव्या भारतासाठी प्रेरणादायी', 'मन की बात'मधून पंतप्रधानांचे देशवासियांना संबोधन