Ahmedabad Plane crash: ऑपरेशन सिंदूरममध्ये पाकिस्तानला मदत अन् आता विमान अपघातामध्येही नाव आलं; तुर्कीनं दिलं स्पष्टीकरण, कंपनी म्हणाली..
Ahmedabad Plane crash: तुर्कीच्या कम्युनिकेशन डायरेक्टरेटने अपघाताबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं की, तुर्की टेक्निकने बोईंग 787-8 प्रवासी विमानाची देखभाल केल्याचा दावा खोटा आहे. 12 जून रोजी अहमदाबादमध्ये या विमानाला अपघात झाला.

अहमदाबाद : 12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेनंतर (Ahmedabad Plane crash) आता तुर्की सरकारकडून यासंदर्भात महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तुर्किने स्पष्टपणे नकार दिला आहे की, दुर्घटनेत सामील असलेल्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाच्या देखभालीत त्यांच्या देशातील कोणत्याही कंपनीचा सहभाग नव्हता. तुर्किच्या कम्युनिकेशन डायरेक्टरेटने जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले की, “टर्किश टेक्निक” (Ahmedabad Plane crash) कंपनीने एअर इंडिया या बोईंग 787-8 विमानावर कधीच देखभाल केली नाही. 2024 आणि 2025 दरम्यान टर्किश टेक्निक व एअर इंडिया यांच्यात झालेल्या करारानुसार फक्त B777 प्रकारच्या विमानांसाठी देखभाल सेवा पुरवण्यात येते, बोईंग 787-8 या करारामध्ये नव्हते.(Ahmedabad Plane crash)
“भारताचा शोक आम्हालाही समजतो”
तुर्किने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली वाहताना म्हटले की, भारतावर ओढवलेल्या या शोकांतिकेमध्ये आम्हीही सहभागी आहोत. त्याचबरोबर, “या दुर्घटनेबाबत चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत आणि त्या दोन्ही देशांमध्ये गैरसमज निर्माण करू शकतात. त्याविरोधात आम्ही कठोर पावले उचलू,” असेही तुर्कियेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
विमान अपघाताची पार्श्वभूमी
एअर इंडिया चे AI-171 हे विमान 12 जून रोजी गुजरातमधून लंडनकडे जात असताना ही दुर्घटना घडली. या विमानात एकूण 230 प्रवासी व 12 क्रू मेंबर्स होते, म्हणजेच एकूण 242 प्रवासी होते. त्यापैकी 241 जणांचा मृत्यू झाला असून फक्त एक प्रवासी, विश्वासकुमार रमेश (ब्रिटिश नागरिक) बचावले आहेत. ते इमर्जन्सी एक्झिटजवळील 11A सीटवर होते. अपघात इतका भीषण होता की, फक्त 31 मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आले आहे आणि त्यापैकी 19 मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. बाकी मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने घेऊन तपासणी सुरू आहे.
भारत-तुर्की संबंधांतील तणाव
गेल्या काही वर्षांपासून भारत आणि तुर्की यांच्यात काही कारणांमुळे तणाव निर्माण झाला आहे. विशेषतः ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुर्कीने पाकिस्तानला समर्थन दिल्यामुळे आणि तुर्की बनावटीच्या ड्रोनच्या वापराबाबत भारताच्या सुरक्षाव्यवस्थेला आव्हान निर्माण झाल्यामुळे, भारताने देशातील महत्त्वाच्या विमानतळांवरील तुर्की कंपनीला हटवण्याचा निर्णय घेतला होता.























