एक्स्प्लोर
लग्न ठरलं, अफगाणिस्तानातून वरात यूपीत आली, अन् लग्न मोडलं!
मुलीच्या नातेवाईकांनी ऐनवेळी लग्न मोडल्यामुळे हिरमोड झालेला बिचारा नवरदेव रिकाम्या हाती मायदेशी परतला.

प्रातिनिधीक फोटो
लखनौ : तो अफगाणिस्तानचा, तर ती उत्तर प्रदेशची. फेसबुकवरुन ओळख झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. घरच्यांच्या संमतीने दोघांचं लग्नही ठरलं. नवरदेव अफगाणिस्तानातून वरात घेऊन आला आणि... इथेच माशी शिंकली. 'काहे दिया परदेस' असा प्रश्न विचारत मुलीच्या नातेवाईकांनी ऐनवेळी लग्न मोडलं. त्यामुळे हिरमोड झालेला बिचारा नवरदेव रिकाम्या हाती मायदेशी परतला. उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यात खलिलाबादमध्ये राहणाऱ्या तरुणीची ओळख वर्षभरापूर्वी 29 वर्षांच्या फरीदुल रफ्ताई या अफगाणी तरुणाशी झाली. फेसबुकवर दोघांचं चॅटिंग सुरु झालं. ओळखीचं रुपांतर मैत्रीत... मैत्रीचं यथावकाश प्रेमात झालं! दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनीही मान्य केला. शनिवारी फरीदुलसोबत त्याचे 60 वर्षीय वडील मोहम्मद कादीर, आई आदिला रफ्ताई, बहीण नादिया आणि 70 वर्षीय काका कासिम वापसी लग्नासाठी भारतात आले. दोघांचा निकाह होणार, इतक्यात मुलीच्या नातेवाईकांनी विरोध करायला सुरुवात केली. मुलीला लग्न करुन परदेशात पाठवण्यास नातेवाईकांचा जोरदार विरोध होता. अखेर मुलीच्या कुटुंबीयांनी हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. लग्न मोडल्यामुळे हिरमुसलेला नवरदेव फरीदुल वऱ्हाडासोबत मायदेशी परतला. मला माझ्या मुलीला वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर करायचं आहे. परदेशात तिचं लग्न लावून देण्याचा निर्णय चुकीचा होता, असं मत निकाह मोडल्यानंतर तिच्या वडिलांनी व्यक्त केलं.
आणखी वाचा























