Gujarat and Himachal Pradesh Opinion Poll 2022 : हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि गुजरातमधील (Gujarat) विधानसभा निवडणुका (Assembly Elections 2022) येत्या काही दिवसांतच जाहीर होतील. निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वीच दोन्ही राज्यातील राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु आहे. 2022 मधील ही शेवटची निवडणूक असून ही निवडणूक 2024 विधानसभा निवडणुकांची फायनल असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून सर्व संघ तयारीला लागले आहेत. भाजपच्या बाजूनं वातावरण निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत अनेक नेते मैदानात उतरले आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यात भाजप (BJP) सत्ता राखणार की, काँग्रेस (Congress) भाजपवर मात करत सत्ता मिळवणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 


दुसरीकडे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गुंतलेली काँग्रेसही निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. यावेळी दोन्ही राज्यात आम आदमी पक्षही तिसरा खेळाडू म्हणून ताकद पणाला लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या दोन्ही राज्यात भाजपची सत्ता आहे. त्याआधी सी व्होटरनं (C VOTER) दोन्ही राज्यांमध्ये एबीपी न्यूजसाठी ओपिनियन पोल केला आहे. दोन्ही राज्यांतील सर्व विधानसभा जागांवर हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. जाणून घेऊया काय म्हणतं सर्वेक्षण...? 


या सर्वेक्षणासाठी दोन्ही राज्यांतील 65 हजार 621 लोकांची मतं जाणून घेण्यात आली. सर्वेक्षणातील मार्जिन आणि एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्क्यांपर्यंत आहे. दोन्ही राज्यात कोणाला किती जागा मिळतील? असा प्रश्न या ओपिनियन पोलमध्ये विचारण्यात आला होता. सर्व्हेमध्ये काय समोर आलं, ते सविस्तर जाणून घ्या. 


गुजरातमध्ये कोणाला किती जागा? (एकूण जागा : 182) 



  • भाजप : 135-143

  • काँग्रेस : 36-44

  • आप : 0-2

  • अन्य : 0-3 


हिमाचल प्रदेशात कोणाला किती जागा? (एकूण जागा : 68) 



  • भाजप : 37-45

  • काँग्रेस : 21-29

  • आप : 0-1

  • अन्य : 0-3 


दोन्ही राज्यांत भाजप गड राखणार 


एबीपी न्यूजसाठी सी व्होटरनं घेतलेल्या या ओपिनियन पोलमध्ये गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये भाजपचीच सत्ता पुन्हा येणार असल्याचं सर्वेमधून समोर आलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांबद्दल बोलायचं झालं तर हिमाचल प्रदेशमध्ये भाजपनं 44 जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसनं 21 जागांवर विजय मिळवला होता. ओपिनियन पोलमध्ये, यावेळी देखील दोन्ही पक्षांना 2017 मध्ये जितक्या जागा मिळाल्या होत्या, तितक्याच जागा मिळतील असा अंदाज आहे. 


गुजरातमध्ये काँग्रेसचा पराभव?


गुजरातबद्दल बोलायचं झालं तर 2017 च्या निवडणुकीत भाजपनं राज्यात 99 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. यावेळी ओपिनियन पोलमध्ये भाजपला मोठी आघाडी मिळत आहे. त्याचबरोबर काँग्रेसचं मोठं नुकसान होऊ शकतं असंही समोर येत आहे. ओपिनियन पोलनुसार, यावेळी काँग्रेसला 30 पेक्षा जास्त जागा कमी मिळण्याची शक्यता आहे. 


सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातचून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :