Road Accident Seat Belt: प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री (Cyrus Mistry Accident Death) यांच्या दुर्देवी अपघाती निधनानंतर कारमध्ये सीट बेल्टचा (Car Seat Belt) वापर करण्याबाबत देशभरात चर्चा सुरू झाली. मात्र, मागील वर्षीच्या रस्ते अपघातातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कार अपघातात मृत्यू झालेल्या 10 पैकी 8 प्रवाशांचा मृत्यू हा सीट बेल्ट न लावल्यामुळे झाला असल्याचे समोर आले आहे. 


केंद्रीय परिवहन खात्याच्या (Union Road Transport Ministry) एका अहवालातून ही बाब समोर आली आहे. या अहवालानुसार, अपघातात मृत्यू झालेल्या सरासरी 10 पैकी 8 कार प्रवासी, चालकांनी सीट बेल्टचा वापर केला नव्हता. तर, दुसरीकडे रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या तीन पैकी दोन दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केला नसल्याचे परिवहन खात्याच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 


जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सीट बेल्टच्या वापरामुळे गंभीर अपघातात गंभीर दुखापत आणि मृत्यूचे प्रमाण कमी होते. तर, पूर्ण चेहरा झाकणारे हेल्मेटचा वापर केल्यास दुचाकीस्वारांना होणाऱ्या गंभीर दुखापतीत 64 टक्के आणि डोक्याला दुखापत होण्याचे प्रमाण 74 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. 


केंद्रीय परिवहन खात्याच्या अहवालानुसार, सीट बेल्टचा वापर न केल्याने झालेल्या मृत्यूंची संख्या उत्तर प्रदेशात अधिक आहे. उत्तर प्रदेशमध्ये 3863 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्या पाठोपाठ मध्यप्रदेश 1737 आणि राजस्थान 1370 जणांच्या मृत्यूची नोंद मागील वर्षात करण्यात आली आहे. 


केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या एकूण 69,385 दुचाकीस्वारांपैकी जवळपास 47,000 लोकांनी हेल्मेटचा वापर केला नव्हता. अशा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालकांचा वाटा दुचाकीवरील सहप्रवाशांच्या तुलनेत जवळपास अडीच पट अधिक होता. केंद्र सरकारला राज्य पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, हेल्मेट न वापरणाऱ्या 32,877 दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे, तर 13,716  दुचाकीवरील सहप्रवाशांचा मृत्यू झाला आहे.


मागील काही वर्षांपासून दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांच्या मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याबद्दल केंद्रीय परिवहन विभागाने चिंता व्यक्त केली आहे. मागील वर्षी रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांच्या संख्येत 45.1 टक्के ही संख्या दुचाकीस्वारांची आहे. जवळपास 30 टक्के मृत्यू (22,786 मृत्यू) हे राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: