NIA Raid In Kerala:   राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency-NIA) ची आज पहाटे केरळमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) शी संबधित तब्बल 58  ठिकाणांवर छापेमारी केली आहे.  एनआयएचे वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पीएफआयचे नेते अन्य नावावर पीएफआय सुरू करण्याच्या प्रयत्नात होते, त्यासंदर्भात कारवाई करण्यात आली आहे. 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएची छापेमारी पहाटे साडेचारपासून सुरू आहे. केरळच्या एर्नाकुलममध्ये पीएफआशी संबधित आठ ठिकाणांवर कारवाई करण्यात आली आहे. तिरुअनंतपुरम येथे सहा जागांवर छापेमारी केली आहे. तसेच इतर अनेक ठिकाणांवर एनआयएची छापेमारी सुरू आहे.


पीएफआय ही संघटना कट्टरतावादी विचारांची संघटना समजली होती. केरळ, कर्नाटकमध्ये या संघटनेचे मोठे कार्यक्षेत्र आहे. देशातील 24 राज्यांमध्ये या संघटनेची शाखा आहे. मु्स्लिमबहुल भागात जनाधार मिळवण्याचा प्रयत्न या संघटनेकडून सुरू होता. महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे,  पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर आदी जिल्ह्यांमध्ये त्यांचे काम सुरू होते. पुणे हे पीएफआयचे मुख्य केंद्र असल्याचे म्हटले जाते. 






PFI वर पाच वर्षाची बंदी


 दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात  पाच वर्षांची बंदी घातली आहे (PFI Ban). केंद्र सरकारने याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. तपास यंत्रणांच्या शिफारसीवर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांत केंद्रीय तपास यंत्रणांनी पीएफआयवर जोरदार कारवाई सुरू केली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA), ईडी (ED) यांच्यासह विविध राज्यातील तपास यंत्रणांनी पीएफआयच्या कार्यालयांवर 22 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर रोजी छापे मारले आहेत. केंद्र सरकारने पीएफआय शिवाय इतर संघटनांवरही बंदी घातली आहे.  


या संघटनांवरही बंदी


पीएफआय व्यतिरिक्त, रिहॅब इंडिया फाउंडेशन (RIF), कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (CFI), ऑल इंडिया इमाम कौन्सिल (AIIC), नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्यूमन राइट्स ऑर्गनायझेशन (NCHRO), नॅशनल वुमन फ्रंट, ज्युनियर फ्रंट, एम्पॉवर इंडिया फाउंडेशन आणि रिहॅब फाउंडेशन, केरळसारख्या सहयोगी संघटनांवरही बंदी घालण्याचा निर्णय गृहमंत्रालयानं घेतला आहे.