(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jodhpur Violence: जोधपूर हिंसाचारात आतापर्यंत 141 जणांना अटक, सद्यस्थिती कशी आहे? डीजीपी यांनी सांगितले...
Jodhpur Curfew: राजस्थानच्या जोधपूरमध्ये ईदच्या दिवशी दोन समुदायांमध्ये झालेल्या हिंसाचाराने वातावरण बिघडले आहे. हिंसाचार रोखण्यासाठी जोधपूरमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
Jodhpur Curfew: राजस्थानच्या जोधपूरमध्ये ईदच्या दिवशी दोन समुदायांमध्ये झालेल्या हिंसाचाराने वातावरण बिघडले आहे. हिंसाचार रोखण्यासाठी जोधपूरमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. परिस्थिती इतकी भीषण आहे की, शहरातील रस्त्यांवर आणि गच्चीवर पोलिसांची तैनाती करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना पोलिस महासंचालक एमएल लाथेर यांनी सांगितले की, जोधपूरमधील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस सर्वतोपरी उपाययोजना करत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत एकूण 141 जणांना अटक केली आहे. यापैकी 133 जणांना कलम 151 अन्वये अटक करण्यात आली असून आठ जणांना इतर गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 4 एफआयआर आणि नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनुसार, 8 एफआयआर नोंदवले आहेत. या हिंसाचारात 9 पोलीस जखमी झाले असून सर्वजण सुखरूप आहेत. शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवांची माहिती तातडीने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना द्यावी, असे आवाहन पोलीस मुख्यालयाकडून करण्यात आले आहे.
याआधी ईदच्या दिवशी झालेल्या जातीय हिंसाचारामुळे जोधपूर शहराचे छावणीत रूपांतर झाले आहे. हिंसाचारानंतर जोधपूर जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. जोधपूरच्या एडीजींनी एबीपीला सांगितले की, "जोधपूरमध्ये अजूनही शांतता आहे, दुपारपासून कोणतीही घटना घडलेली नाही, असे म्हणता येईल की परिस्थिती नियंत्रणात आहे आणि शांतता आहे.'' आम्ही हिंसाचाराचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. जोधपूर हिंसाचार प्रकरणी सध्या काहीही बोलणे घाईचे ठरेल, तपास अजून सुरू आहे, याचा छेडा लागतच आम्ही याबाबत मीडियाला माहिती देऊ, असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, राजस्थानच्या जोधपूरमध्ये ईदच्या दिवशी जातीय हिंसाचारामुळे वातावरण अधिकच चिघळले. जालोरी गेट चौकातील बालमुकंद बिसा सर्कल येथे भगवा ध्वज उतरवून त्या जागी इस्लामिक चिन्हे असलेले झेंडे फडकावल्यानंतर दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली. या घटनेनंतर मध्यरात्री दोन्ही समाजात जोरदार दगडफेक झाली. त्याचबरोबर या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी आता पोलिसांनी 141 जणांना अटक केली आहे. या संपूर्ण घटनेबाबत पोलीस आता आरोपींची चौकशी सुरू करत आहेत.