GDP Data For 3rd Quarter FY23 : आर्थिक वर्ष 2022-23 ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसर्‍या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था 4.4 टक्के दराने वाढली असल्याचे समोर आले आहे. मागील आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपी (GDP Rate) 5.4 टक्के इतका नोंदवण्यात आला होता. तिसऱ्या तिमाहीसाठी जाहीर केलेला जीडीपीचा आकडा चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत कमी आहे. दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था 6.3 टक्के दराने वाढली होती. त्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत आर्थिक वाढीचा वेग मंदावला आहे.


सांख्यिकी मंत्रालयाने  (Ministry of Statistics & Programme Implementation) आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आर्थिक विकास दर 7 टक्के इतका राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जीडीपीचा दर 9.1 टक्के इतका होता. 


जीडीपीची आकडेवारी जाहीर करताना मंत्रालयाने सांगितले की, आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत, जीडीपी 40.19 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो मागील वर्षी याच तिमाहीत 38.51 लाख कोटी रुपये होता. त्याच वेळी, 2022-23 मध्ये नाममात्र जीडीपी 272.04 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. मागील आर्थिक वर्ष 2021-22 मधील याच तिमाहीत 234.71 लाख कोटी रुपयांपेक्षा 15.9 टक्के जास्त आहे.


कोणत्या क्षेत्राचा किती विकास दर?


NSO ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2022-23 मधील तिसऱ्या तिमाहीत कृषी क्षेत्राचा विकास दर हा 3.7 टक्के इतका नोंदवण्यात आला. तर, 2021-22 मध्ये या कालावधीत 2.3 टक्के इतका विकास दर नोंदवण्यात आला होता. उत्पादन क्षेत्राचा विकास दर घसरला असून उणे झाला आहे. उत्पादन क्षेत्राचा जीडीपी -1.1 टक्के इतका राहिला आहे. मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीच्या कालावधीत 1.3 टक्के इतका दर होता.  बांधकाम क्षेत्राचा वाढीचा दर हा 8.4 टक्के राहिला आहे. 2021-22 मध्ये या कालावधीत हा दर 0.2 टक्के इतका राहिला. 


या प्रकारे व्यापार, हॉटेल, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन आणि ब्रॉडकास्टिंगशी संबंधित असलेल्या सेवांचा जीडीपी दर हा 9. 7 टक्के इतका राहिला. मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत हा दर 9.2 टक्के इतका नोंदवण्यात आला. वित्तीय सेवा, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवांचा जीडीपी दर 5.8 टक्के इतका नोंदवण्यात आला. मागील वर्षी तिमाहीत हा दर 4.3 टक्के इतका होता.


अन्नधान्य महागाईने चिंता वाढली 


 दरम्यान, जानेवारी महिन्यात किरकोळ महागाई वाढल्याने चिंता वाढली. मात्र, अन्नधान्य महागाईत वाढ झाल्याने या चिंतेत भर पडली. अन्नधान्य महागाई डिसेंबर मधील 4.19 टक्क्यांच्या तुलनेत जानेवारी 2023 मध्ये 5.94 टक्क्यांवर पोहोचली आहे. आगामी काळात अन्नधान्य महागाई आणखी त्रासदायक ठरू शकते, असे म्हटले जात आहे. यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून अन्नधान्य उत्पादनात घट होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :