India vs Australia 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया(IND vs AUS) यांच्यातील तिसरा कसोटी सामना उद्या म्हणजेच 1 मार्चपासून इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडिया मालिकेत 2-0 ने पुढे आहे. आता तिसरा सामना जिंकून भारतीय संघ पुन्हा एकदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सलग तिसरा विजय नोंदवण्यासाठी सज्ज झाली आहे. इंदूर कसोटीपूर्वी टीम इंडियाचा प्रत्येक खेळाडू मैदानात कसून सराव करत असून घाम गाळताना दिसत आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाची कामगिरी दमदार होती.


दरम्यान इंदूर कसोटीपूर्वी टीम इंडियाने चांगलाच सराव केला असून या सरावाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, संघाचा प्रत्येक खेळाडू तिसऱ्या कसोटीसाठी जीव तोडून सराव करत आहे. यामध्ये विराट कोहली, केएल राहुल, अक्षर पटेल, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी यांच्यासह संघातील इतर खेळाडू देखील दिसत आहेत. काही खेळाडू क्षेत्ररक्षणाचा सराव करताना दिसले, काहींनी नेटमध्ये फलंदाजीचा सराव केला. तसंच गोलंदाजांनी नेटमध्ये गोलंदाजी करत घाम गाळला. होळकर क्रिकेट स्टेडियमवर हा संपूर्ण सराव सुरू आहे.


पाहा VIDEO-






भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेशासाठी सज्ज


तिसरी कसोटी जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करेल. सध्या, टीम इंडिया 64.06 च्या विजयाच्या टक्केवारीसह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया 66.67 विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर आहे.


टीम इंडियाची मालिकेत आघाडी


या मालिकेत टीम इंडियाने पहिले 2 सामने जिंकून 0-2 अशी आघाडी घेतली आहे. यासोबतच तिसरा सामना जिंकल्यानंतर पुन्हा एकदा टीम इंडिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकणार आहे. नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत संघाने एक डाव आणि 132 धावांनी आणि दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत 6 गडी राखून विजय मिळवला.


तिसऱ्या कसोटीसाठी संभाव्य संघ 


टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.


ऑस्ट्रेलियन संघ : स्टीव स्मिथ (कर्णधार), स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमरन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मॅथ्यू कुह्नमॅन.


हे देखील वाचा-