Important Days in April 2023 : अवघ्या काही दिवसांवर एप्रिल महिना येऊन ठेपला आहे. अशातच, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, एप्रिल महिन्यात कोणकोणते सण आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचे दिवस साजरे केले जातात. तसेच प्रत्येक दिनाचं वेगळं महत्व नेमकं काय आहे? एप्रिल महिन्यात कोणत्या थोर व्यक्तीमत्व असलेल्या महापुरूषांची, संतांची जयंती तसेच पुण्यतिथी आहे हे देखील या निमित्ताने जाणून घेणार आहोत. 


1 एप्रिल - कामदा एकादशी 


भगवान विष्णूची पूजा कामदा एकादशीच्या दिवशी केली जाते. या दिवशी उपवास केल्याने सर्व प्रकारच्या दु:खापासून मुक्तता मिळते. असे मानले जाते की, या दिवशी उपवास केल्याने भगवान विष्णू अपूर्ण इच्छा पूर्ण करतात. म्हणून त्याला फलदा एकादशी किंवा कामदा एकादशी असेही म्हणतात. 


1 एप्रिल - जागतिक एप्रिल फूल डे (World April Fool's Day)


दरवर्षी 1 एप्रिल हा दिवस जगभरात 'एप्रिल फूल डे'  म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांबरोबर विनोद, मस्ती करतात, चेष्टा करतात. आजकाल लोक सोशल मीडियाच्या मदतीने या दिवसाचा खूप आनंद घेतात.


2 एप्रिल- जागतिक ऑटिझम जागरूकता दिन


जागतिक ऑटिझम जागरूकता दिन दरवर्षी 2 एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो. जगभरात ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या लोकांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांना प्रोत्साहित करणं हा या दिनामागचा मुख्य उद्देश आहे.


2 एप्रिल - अजय देवगण, अभिनेता, वाढदिवस 


अजय देवगण हा एक भारतीय चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. अजयच्या आतापर्यंतच्या एकूण कारकिर्दीत त्याने शंभरहून अधिक हिंदी चित्रपटांतून काम केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सर्वांत लोकप्रिय आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक म्हणून अजयची गणना केली जाते. अजयने आतापर्यंत गोलमाल, सिंघम, दृश्यम, तानाजी अशा अनेक हिट चित्रपटांमधून आपल्या भूमिकेसा ठसा उमटवला आहे. अजय देवगनला आतापर्यंत दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. 2016 मध्ये भारत सरकारकडून अजयला देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देऊन गौरविण्यात आले.


2 एप्रिल - कपिल शर्मा, अभिनेता, कॉमेडी किंग


पंजाबमधील अमृतसर येथे जन्मलेल्या कपिल शर्माला कॉमेडी किंग म्हणून ओळखलं जातं. द ग्रेट इंडिया लाफ्टर चॅलेंज हा शो जिंकल्यानंतर कपिलने मागे वळून पाहिलं नाही. कपिलचा 'द कपिल शर्मा शो' तर प्रेक्षक आवर्जून पाहतात. कपिलच्या शोचे भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. नुकताच कपिलने झ्विगॅटो नावाचा चित्रपट केला. 


4 एप्रिल - वर्धमान महावीर जयंती


जैन धर्मातील चोवीस तीर्थंकरांपैकी अखेरचे तीर्थंकर. महावीरांच्या आधी जैन धर्माचे 23 तीर्थकर  होऊन गेले, असे जैन धर्माचे अनुयायी मानतात आणि त्यामुळे महावीर हे जैन धर्माचे संस्थापक ठरत नाहीत; परंतु जैन धर्माला प्रभावशाली बनविण्याचे फार मोठे श्रेय महावीरांकडे जात असल्यामुळे जगातील प्रमुख धर्मसंस्थापकांच्या मालिकेतील गौतम बुद्ध वगैरेंच्या बरोबरीने त्यांचे नाव घेतले जाते.


3 एप्रिल - प्रदोष व्रत 


प्रदोष व्रत भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. विशेषत: सोम प्रदोष व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या व्रताच्या प्रभावाने साधकाचे रोग, दोष, दुःख, दारिद्र्य नाहीसे होते.


5 एप्रिल - राष्ट्रीय सागरी दिन (National Maritime Day)


5 एप्रिल 2022 हा दिवस भारतात राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतातील सर्वात जुनी शिपिंग कंपनी, द सिंडिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी लिमिटेडच्या पहिल्या जहाजाच्या युनायटेड किंगडमला प्रवासाचे स्मरण करतो. पर्यावरणदृष्ट्या सकारात्मक पद्धतीचा प्रतिसाद देणारा दृष्टिकोन दर्शविण्याकरिता भारतात दरवर्षी 5 एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन साजरा करण्यात येतो. सर्वात पहिला हा दिवस 5 एप्रिल 1964 रोजी हा दिवस प्रथमच साजरा करण्यात आला.


6 एप्रिल - हनुमान जयंती (Hanuman Jayanti)


प्रभू रामचंद्रावर निस्सीम भक्ती करणाऱ्या हनुमंताचा जन्म महोत्सव म्हणजेच हनुमान जयंती. भगवान हनुमानाची जयंती दरवर्षी चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी घरोघरी बजरंगबलीची पूजा, विधी, सुंदरकांड पठण इ. केले जाते.


7 एप्रिल - गुड फ्रायडे (Good Friday)


जगभर गुड फ्रायडे साजरा केला जातो. या दिवसाचं ख्रिश्चन समाजात मोठं महत्व आहे. येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील चर्चमध्ये धार्मिक प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात येतं. गुड फ्रायडे नेहमी इस्टर संडेच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी साजरा केला जातो. या वर्षी 7 एप्रिललला गुड फ्रायडे साजरा करण्यात येणार आहे. 


7 एप्रिल- जागतिक आरोग्य दिन (World Health Day)


 7 एप्रिल 1948 साली जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. आरोग्य क्षेत्रात साजरा केला जाणारा हा महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस नागरिकांच्या आरोग्याची पातळी सुधारण्यासाठी आणि लोकांना आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. जगभरातील प्रत्येक व्यक्तीला चांगले आरोग्य आणि सुविधा मिळाव्यात हा या दिनामागचा उद्देश आहे. 


7 एप्रिल - जितेंद्र, अभिनेता, वाढदिवस


बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे झाला. ते लहानपणापासून मुंबईत वाढले. जितेंद्र यांनी अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूड इंडस्ट्रीला दिले. त्यापैकी, हिंमतवाला, तोहफा, हैसियत, आदमी खिलौना है यांसारख्या चित्रपटांचा उल्लेख आवर्जून केला जातो. जितेंद्र यांनी दोन मुलं आहेत. मोठी मुलगी एकता कपूर ही निर्माती आहे तर अभिनेता तुषार कपूर हा जितेंद्र यांचा मुलगा आहे.


9 एप्रिल - संकष्ट चतुर्थी 


चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी करण्याची परंपरा आहे. या महिन्यातील संकष्ट चतुर्थी 9 एप्रिल रोजी केली जाणार आहे. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळते. तसेच, या दिवशी गणपतीला त्याच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्याने इच्छित फळ मिळते असे मानले जाते. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ 09.56 आहे.


10 एप्रिल - जागतिक होमिओपॅथी दिन (World Homeopathy Day)


दरवर्षी 10 एप्रिल या दिवशी जागतिक होमिओपॅथी दिन पाळण्यात येतो. दरवर्षी 10 एप्रिल या दिवशी होमिओपॅथी या वैद्यकीय उपचार पद्धतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणारे डॉक्टर क्रिस्टीएन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनिमेन यांचा जन्‍मदिवस ‘जागतिक होमिओपॅथी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी डॉक्‍टर हॅनिमेन यांची 265 वी जयंती साजरी केली जात आहे. डॉ. सॅम्युअल हॅनिमेन यांनी 1969 साली पर्यायी औषधोपचार म्हणून होमिओपॅथी ही पद्धत विकसित केली.


11 एप्रिल – महात्मा फुले जयंती 


महात्मा जोतीराव गोविंदराव फुले हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केले. स्त्रियांची अवस्था सुधारण्यासाठी आणि समाजात त्यांना ओळख प्रदान करण्यासाठी त्यांनी 1854 मध्ये एक शाळा उघडली. ही शाळा देशातील पहिली अशी शाळा होती जी मुलींसाठी उघडण्यात आली होती. 


11 एप्रिल- राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन (National Safe Motherhood Day)


महिलांच्या मातृत्वाच्या सुरक्षेसाठी भारतात दरवर्षी 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा केला जातो. व्हाइट रिबन अलायन्स इंडिया (WRAI) चा हा उपक्रम आहे. सुरक्षित मातृत्वासाठी, भारत सरकारने 2003 मध्ये 11 एप्रिल हा राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. गर्भधारणेदरम्यान, प्रसूतीनंतर आणि प्रसूतीनंतर महिलांना जास्तीत जास्त आरोग्य सेवा दिली जावी, जेणेकरून प्रसूतीदरम्यान किंवा बाळाला जन्म दिल्यामुळे कोणत्याही महिलेचा मृत्यू होऊ नये म्हणून हा दिवस पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. बाळंतपणामुळे होणाऱ्या मातांच्या मृत्यूच्या बाबतीत भारताची स्थिती अत्यंत वाईट आहे.      


14 एप्रिल - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण आणि उत्सव आहे. हा सण दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला 'समता दिन' म्हणून तर महाराष्ट्र शासन ज्ञान दिन म्हणून साजरा करते.


14 एप्रिल – मेष संक्रांती, बैसाखी, बिहू, खरमास समाप्त


जेव्हा सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मेष संक्रांत म्हणतात. या दिवशी खरमासही संपतात आणि सर्व शुभ कार्यांवर बंदी असते. बैसाखीचा सणही याच दिवशी साजरा केला जातो. शीख समुदायाचे लोक नवीन वर्ष म्हणून बैसाखी साजरे करतात. बैसाखी हा सण प्रामुख्याने शेतीचा सण म्हणून साजरा केला जातो. आसाममध्ये हा बिहू म्हणून साजरा केला जातो.


15 एप्रिल - बंगाली नववर्ष (Bengali New Year)


बंगाली नववर्ष - बंगाली नवीन वर्ष जगभरातील बंगाली लोकांसाठी एक मोठा दिवस आहे. या दिनाला 'पोहेला बैशाख' असे सुद्धा म्हणतात. हा सण बंगाली समाजात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवीन वर्ष बंगाली दिनदर्शिकेच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो, हा दिवस 15 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. या उत्सवात खाद्य महोत्सव, जत्रा आणि इतर गोष्टींचा समावेश केला जातो.


14 एप्रिल - राष्ट्रीय अग्नीशमन दिन (National Fire Service Day) 


राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजरा केला जातो. 14 एप्रिल 1944 रोजी , कापसाच्या गाठी, स्फोटके आणि युद्धसामुग्रीने भरलेल्या फोर्टस्टीकेन नावाच्या मालवाहू जहाजाला मुंबई बंदरात चुकून आग लागली. आग विझवताना जहाजातील स्फोटक पदार्थामुळे 66 अग्निशमन दलाचे जवान शहीद झाले होते. या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा दिवस देशभरात साजरा केला जातो.


17 एप्रिल - जागतिक हिमोफिलिया दिन (World Hemophilia Day)


17 एप्रिल हा जागतिक हेमोफेलिया दिन म्हणून संपूर्ण जगात पाळला जातो. हेमोफेलिया हा आनुवंशिक आजार आहे. ज्यात शरीरात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव वाढतो. एखाद्या व्यक्तीला जर हेमोफेलिया हा आजार झाला असेल तर इजा झालेल्या भागात अंतर्गत रक्तस्त्राव होतो. त्यातून त्या भागाला सूज येते. पण, अनेकदा हा आजार दुर्लक्षित राहिल्याने किंवा या विषयी जनजागृती नसल्याने 80 टक्के लोकांना या आजाराबाबतची माहितीच नसते. तसेच राज्यातील जवळपास 3 हजारांहून अधिक रुग्ण हेमोफेलियाने ग्रस्त आहेत.


18 एप्रिल - जागतिक वारसा दिन (World Heritage Day) 


लिखित स्वरूपाच्या इतिहासाबरोबर वास्तुरुपी राष्ट्रवैभवाचे योग्य संवर्धन करणे हे सरकार बरोबर सुजाण नागरिकांचाही कर्तव्य आहे, याची समाज मनाला जाण देण्यासाठी युनेस्को तर्फे 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. इतिहासाच्या पाऊल खुणांबरोबर धार्मिक अधिष्ठानासह सांस्कृतिक मोलही आहे. त्यातील काहींना राष्ट्राच्या अस्मितेची शान आहे. त्यात गडकोट, कमानी, राजवाडे, मनोरे, विजयस्तंभ प्रशासकीय इमारतींचा समावेश आहे.


19 एप्रिल -जागतिक यकृत दिन (World Liver Day)


दरवर्षी 19 एप्रिल हा दिवस जागतिक यकृत दिन म्हणून साजरा केला जातो. शरीराच्या एकूण आरोग्यामध्ये यकृताच्या भूमिकेबद्दल माहिती आणि लोकांना यकृताशी संबंधित आजार आणि परिस्थितींबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश आहे. मेंदूनंतर यकृत (Liver) हा शरीरातील दुसरा सर्वात मोठा आणि गुंतागुंतीचा अवयव आहे.


20 एप्रिल - खग्रास सूर्यग्रहण


'खग्रास सूर्यग्रहण' म्हणजे पृथ्वीवरून पाहताना सूर्य पूर्णपणे झाकला जातो त्याला 'खग्रास सूर्यग्रहण' असं म्हणतात. एरव्ही चंद्र सूर्यापेक्षा, अगदी पृथ्वीपेक्षाही खूपच लहान आहे. पण तो पृथ्वीपासून जवळ आहे. त्यामुळे पृथ्वीवरून पाहताना आपल्याला सूर्य आणि चंद्र आकाराने एकसारखे दिसतात. आणि म्हणूनच खग्रास स्थितीत चंद्राचं बिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकतं. मात्र, यावेळेस हे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे वेधादि नियम पाळू नयेत. 


22 एप्रिल - अक्षय्य तृतीया 


अक्षय्य तृतीया, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे, अक्षय्य तृतीया. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व असतं. विवाह, गृहप्रवेश यासारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. वैशाख शुल्क पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच, तिसऱ्या दिवसी हा सण साजरा केला जातो. या वर्षी 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीया हा सण आहे. अक्षय्य तृतीयेला (Akshay Tritiya) आखा तीज किंवा अक्षय तीज असंही म्हणतात. 


22 एप्रिल - रमजान ईद 


मुस्लीम धर्मीयांमध्ये रमजान ईद हा सण अत्यंत पवित्र मानला जातो. रमजान ईद मुस्लीम धर्मींयांचा सर्वात मोठा सण म्हणूनही ओळखला जातो. रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी ईद-उल-फित्र साजरी केली जाते. रमजान महिना म्हणजे प्रार्थना आणि रोजा (उपवास) करण्याचा महिना. रमजान ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव नवे कपडे घालून मशिदीत जातात. नमाज पडतात. एकमेकांना शुभेच्छाही देतात. तसेच, या दिवशी घरोघरी शिरखुर्मासारखे गोड पदार्थ बनवले जातात.


22 एप्रिल- जागतिक (पृथ्वी) वसुंधरा दिन


वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. आपल्या एकुलत्या एका पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. हवा, पाणी, जंगले यांसारख्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविचारी वापर केल्याने आणि वाढत्या प्रदुषणाचे परिणाम दिसतच आहेत आणि हे असेच चालू राहिले तर मानवाचेच भविष्य अंध:कारमय आहे हे निश्चित आहे. याबाबत प्रबोधन करण्यासाठी 22 एप्रिल हा वसुंधरा दिन साजरा केला जातो. 


23 एप्रिल - विनायक चतुर्थी 


पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात. दर महिन्याला येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात, तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. वैशाख महिन्यातील विनायक चतुर्थी रविवार, 23 एप्रिल रोजी येत आहे. या दिवशी श्रीगणेशाची पूजा करण्याबरोबरच उपवास ठेवला जातो. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात, असा विश्वास आहे.


23 एप्रिल - जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन


या दिवसाला जागतिक पुस्तक दिन म्हणूनही ओळखले जाते. पुस्तक वाचनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 23 एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. युनेस्कोच्या मते, "तरुण पिढ्यांना शिक्षित करण्यासाठी कथा सांगणे हे एक अविश्वसनीय प्रभावी साधन आहे." या दिवशी मरण पावलेल्या विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हंटेस आणि इंका गार्सिलासो डे ला वेगा यांच्यासह प्रसिद्ध लेखकांना आदर देण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. 


25 एप्रिल - जागतिक मलेरिया दिन (World Malaria Day)


मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. जागतिक स्तरावर दरवर्षी मलेरिया दिन 25 एप्रिल रोजी मलेरिया नियंत्रित करण्यासाठी पाळण्यात येतो.  जागतिक आरोग्य असेंब्लीच्या 60 व्या सत्रामध्ये मे 2007 मध्ये हा दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.मलेरियाचे गांभीर्य लक्षात घेता 25 एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून ओळखला जातो.


27 एप्रिल - गुरुपुष्यामृत योग 


प्रत्येक वर्षाची काहीतरी वैशिष्ट्य असतात. मराठी 'शोभन नाम संवत्सर' या नवीन वर्षाबाबत जर बोलायचं झालं तर यावर्षी सहा गुरुपृष्यामृताचे योग आहेत. या योगावर लोक अनेक वस्तूंची खरेदी करतात. असा हा योग यावर्षी सहा वेळा आहे. गुरुपुष्यामृत योग 27 एप्रिल रोजी सकाळी 06.58 पासून दुसऱ्या दिवशी सकाळी 06.15 पर्यंत असेल. 


27 एप्रिल- जागतिक पशुवैद्यकीय दिन (World Veterinary Day)


जागतिक पशुवैद्य दिन 27 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. दरवर्षी एप्रिल महिन्याचा शेवटचा शनिवार हा जगभरात पशुवैद्यकीय दिन म्हणून साजरा केला जातो. इंग्लंडमधील प्रा. जॉन गमजी यांनी 14 ते 18 जुलै 1863 मध्ये जर्मनीमधील हॅम्बुर्ग येथे युरोपमधील पशुवैद्यकांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय पशुवैद्यक कॉंग्रेसची स्थापना झाली. या कॉंग्रेसचे पुढे जागतिक पशुवैद्यक संघटनेमध्ये रूपांतर झाले. ही संघटना जगभरातील पशुवैद्यकांचे प्रतिनिधित्व करते. जगभरातील 90 राष्ट्रीय पशुवैद्यक संघटना आणि 12 जागतिक पशुवैद्यक संघटना या संघटनेशी जोडलेल्या आहेत. या दिवशी विशेष कार्यक्रमांच्या माध्यमातून पशुवैद्यकांना विशेष गुणवत्ता पारितोषिकांने सन्मानित करण्यात येते. 


29 एप्रिल - सीता नवमी 


माता सीतेचे स्थान अनन्य साधारण आहे. भगवान श्रीरामांची अर्धांगिनी आणि संपूर्ण जगाची पूज्यनीय माता सीतेला भाविकांच्या हृदयात एक वेगळंच स्थान आहे. देवी सीतेचा जन्म दिवस हा सीता नवमी म्हणून साजरा केला जातो. सीता नवमी हा हिंदूंच्या सर्वात शुभ सणांपैकी एक आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, हा शुभ दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला येतो. यावर्षी सीता जयंती ज्याला जानकी नवमी म्हणूनही ओळखली जाते ती 29 एप्रिल रोजी साजरी केली जाईल.


29 एप्रिल - आंतरराष्ट्रीय नृत्य दिन (International Dance day 2023)


नृत्य किंवा डान्स हा केवळ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचाच नव्हे तर संबंधित संस्कृतीचा आत्मा असतो. नृत्यावरून त्या संस्कृतीचा अंदाज लावता येतो. नृत्य हे मानवाच्या अभिव्यक्तीचा अविष्कार आहे. आपल्या शरीराच्या माध्यमातून विविध भावना व्यक्त करण्याचं ते एक माध्यम आहे. मनुष्याच्या आयुष्यात असलेल्या या नृत्याचे महत्व जगाला पटवून देण्यासाठी दरवर्षी 29 एप्रिलला 'आंतरराष्ट्रीय नृत्य दिन' साजरा केला जातो. 


30 एप्रिल - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती 


राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी 30 एप्रिल 1909 रोजी झाला. 1925 मध्ये त्यांनी ‘आनंदामृत’ ग्रंथाची रचना केली. ते स्व:त भजन, कीर्तन, प्रवचन करत असत. त्यांनी अध्यात्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात फार मोठे कार्य केले ग्रामगीतेसारखे फार मोठे साहित्य निर्माण केले. 19 नोहेंबर 1943 रोजी त्यांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. जनमानसात भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात ते प्रसिद्धीस आले. त्यांच्या या आघाध कार्यामुळे लोक त्यांना 'राष्ट्रसंत' म्हणून ओळखू लागले. 


महत्त्वाच्या बातम्या :