Solapur Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) हजेरी जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळं नुकसान झालं आहे. दरम्यान, सोलापूर (solapur) जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. सोलापूर शहरासह अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा या तालुक्यात पावसानं हजेरी लावली. कुठे शेती पिकांना फटका बसलाय तर कुठे घरांचं नुकसान झालंय. तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळं झाडे उन्मळून पडली आहेत.
विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं सोलापूर शहरात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. यामुळं काही ठिकाणी वाहतूक व्यवस्था खोळंबली होती. अग्निशमन दलाचे जवळपास 20 जवान झाडे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत होते. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. महावितरणच्या विद्युत यंत्रणाचे मोठे नुकसान झाले आहे. शहरात 20 ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत तर जवळपास 70 ठिकाणी विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत. त्यामुळं सोलापुरातल्या अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. महावितरणने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेऊन रात्री 11 वाजेपर्यंत 80 टक्के विद्युत पुरवठा सुरळीत केल्याचा दावा केला. ग्रामीण भागात झालेल्या पावसानं शेती पिकांचं नुकसान झालं आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. कालपासूनच सोलापूर शहरासोबतच ग्रामीण भागातील वातावरणात बदल झाला होता. तापमानाचा पारा खाली उतरला होता. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी मात्र थोड्या प्रमाणात उन्हाची तीव्रता जाणवली. दुपारनंतर हवामानात बदल झाला अन् ढग दाटून आले. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाने सुरुवात केली अन् बघता बघता शहरातील सर्व वातावरण बदलले.
राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस, शेती पिकांना मोठा फटका
भर उन्हाळ्यात महाराष्ट्रावर ओढवलेले अवकाळी पाऊस (unseasonal rain) आणि गारपीटीचे संकट अजूनही संपलेले नाही. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिला आहे. या पावसामुळं मराठवाड्यात 10 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: