Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) चिकलठाण्यातील चौधरी कॉलनीत शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एक संतापजनक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत निर्दयी बापाने आपल्या दोन मुलांना विहिरीत फेकून दिले. यात एका मुलाला वाचवण्यात स्थानिकांना यश मिळाले असून, एकाचा मात्र पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. तर श्रेयस राजू भोसले (वय 7 वर्षे) असे मृत मुलाचे तर शिवम राजू भोसले (वय 9 वर्षे) असे बचावलेल्या मुलाचे नाव आहे. तसेच राजू प्रकाश भोसले (वय 33 वर्षे) असे निर्दयी बापाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू भोसले हा शहरातील चौधरी कॉलनीत आई, वडील व दोन मुलांसह राहतो. तर चिकलठाणा भागात वेल्डींगची कामे करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितो. मात्र राजूला दारूचे व्यसन लागले. रोज दारू पिऊन घरी येत असल्याने त्याचे पत्नीसोबत वाद होऊ लागला. मात्र रोजच्या या त्रासाला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी राजूची पत्नी माहेरी निघून गेली होती. मात्र माहेरी जाताना दोन्ही मुलं राजूकडेच सोडून गेली. त्यामुळे राजूच मुलांचा सांभाळ करीत होता. मात्र शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास तो पुन्हा दारू पिऊन घरी आला. त्यानंतर घरापासून 200 मीटरवर असलेल्या एका विहिरीकडे दोन्ही मुलांना घेऊन गेला आणि दोन्ही मुलांना विहिरीत फेकून देऊन घरी परत आला.
राजूने शुक्रवारी रात्री दारूच्या नशेत टोकाचे पाऊल उचलत आपल्या नऊ आणि सात वर्षांच्या दोन मुलांना सोबत घेऊन घरापासून जवळच असलेल्या विहिरीत ढकलून दिले. यात सात वर्षीय श्रेयस राजू भोसले याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर शिवम राजू भोसले याला वाचविण्यात स्थानिकांना यश आले. चिकलठाण्यातील चौधरी कॉलनीत शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान एका मुलाला बाहेर काढल्यावर दुसरा मुलगा मात्र सापडत नव्हता. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या शोध कार्यानंतर पाण्यात बुडालेल्या मुलाला बाहेर काढण्यात यश आले, पण त्याचा मृत्यू झाला होतं. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
तरुणामुळे वाचला जीव...
दारूच्या नशेत असलेल्या राजू भोसलेने दोन्ही मुलांना विहिरीत ढकलून तेथून निघून गेला. दरम्यान विहिरीतून मुलांच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. त्यामुळे तेथेच राहणाऱ्या अनिरुद्ध दहिहंडे या तरुणाने मुलांचं आवाज आल्याने त्याने तत्काळ विहिरीकडे धाव घेतली. पुढे त्याने कसलाही विचार न करता थेट विहिरीत उडी मारली. त्यामुळे 9 वर्षीय शिवमला वाचविण्यात त्याला यश मिळाले. पण, श्रेयसचा त्याला शोध घेता आला नाही आणि दुर्दैवाने त्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या: