सोलापूर: आषाढी एकादशीची विठूरायाची शासकीय महापूजा सलग दुसऱ्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून लवकरच मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. विठ्ठल मंदिराच्या विकासासाठी मंजूर झालेल्या 78 कोटीच्या आराखड्याच्या संदर्भात हाय पॉवर कमिटीची बैठक लवकरच होणे अपेक्षित असून आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या आराखड्याचा नारळ फोडला जाईल असेही गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.  


आषाढी एकादशीच्या दृष्टीने मंदिर समितीने जय्यत तयारीला सुरुवात केल्याचे सांगताना यात्रा काळात मंदिरामध्ये मोबाईल नेण्यास बंदी असणार नसल्याचेही औसेकर यांनी सांगितले. आषाढी यात्रेसाठी 20 जूनला देवाचा पलंग निघणार असून यानंतर देवाचे 24 तास दर्शन सुरु होणार असल्याचेही औसेकर यांनी सांगितले. 
       
राज्याच्या सत्तासंघर्षाच्या लढाईच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सत्ता राहिल्याने यंदाची आषाढीची पूजा करण्याचा मान पुन्हा शिंदे याना मिळणार आहे. गेल्या आषाढी यात्रेच्या वेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खुर्ची गेल्याने एकनाथ शिंदे यांना हा पूजेचा पहिल्यांदाच मान मिळाला होता. आता मंदिराच्या विकासाच्या आराखड्याबाबत वारकरी संप्रदायाचे लक्ष लागून राहील आहे. 
       
ज्ञानोबा तुकाराम आदी संतांच्या काळातील म्हणजे 700 वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर कसे असेल याची सगळ्यांनाच उत्कंठा लागून राहिली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आराखड्यासाठी विशेष परिश्रम घेतल्याने पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली 73 कोटी 80 लाख रुपयाचा आराखडा मंजूर करण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी अर्थसंकल्पात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी 73 कोटी 80 लाखांची तरतूद केली होती.  मात्र यानंतर राज्यात सत्ताबदल झाल्यावर काही अधिकाऱ्यांनी दुसऱ्या आर्किटेककडून पुन्हा नव्याने आराखड्याचे काम सुरु केल्याने हा प्रकल्प रेंगाळला आहे. 
       
विठुरायाच्या बाबतीत 'नाही घडविला नाही बैसविला' ही मान्यता वारकरी संप्रदायाची आहे.  विठ्ठल मंदिर हे 11 व्या शतकातील असल्याचे अभ्यासक मानत असले तरी त्याही पूर्वीपासून विठूरायाचे हे मंदिर अस्तित्वात असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे . 
      
आता पुन्हा 700 वर्षापूर्वीच्या मूळ मंदिराप्रमाणे या मंदिराला रूप देण्यासाठी हा आराखडा  पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार बनविण्यात आला आहे. या आराखड्याचे पाच टप्प्यात कामे केली जाणार असून यात मंदिराला मूळ हेमाडपंथी रूप देण्यासाठी जिथे दगडांची झीज झाली आहे अशा ठिकाणी रासायनिक संवर्धन केले जाणार आहे. याशिवाय मंदिराचे आयुष्य वाढविण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात मजबुतीकरणाचे काम केले जाणार आहे. विठ्ठल मूर्तीला हानिकारक असलेले गाभाऱ्यात बसविलेले ग्रेनाईट हटवून त्यामागील  दगडी बांधकाम मूळ स्वरूपात आणणार आहेत. 
       
तिसऱ्या टप्प्यात नव्या पद्धतीने बांधलेले नामदेव महाद्वाराचे आरसीसी काम पाडून तेथे मूळ मंदिराला शोभेल अशा पुरातन दगडात महाद्वार बनविले जाणार आहे. याशिवाय मंदिरावरून जाणारी दर्शन रांग काढून मंदिराशेजारी एक स्काय वॉक  बनविला जाणार आहे. अखेरच्या टप्प्यात सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा, वायरिंग आणि वातानुकूलित यंत्रणा याचे काम केले जाणार आहे.  


दोन वर्षांपूर्वी  आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी आलेल्या त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिराच्या विकास आराखडा आणि इतर प्रश्नासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पाळत त्यासाठी 73 कोटी 80 लाखांची तरतूद देखील केली होती. आता शिंदे फडणवीस सरकारने हे काम तातडीने सुरु केले तर  येत्या पाच वर्षात जगभरातील लाखो विठ्ठल भक्तांना 700 वर्षापूर्वीचे म्हणजे संतकालीन विठ्ठल मंदिर पाहायला मिळणार आहे. मात्र अजूनही या प्रकल्पाबाबत हाय पॉवर कमिटीकडून हिरवा झेंडा न दाखविल्याने हा प्रकल्प रखडला आहे. आता यंदाच्या आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचा नारळ फोडायचे संकेत मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिल्याने लवकरच या कामाला सुरुवात होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत .