Palghar : विक्रमगडमध्ये विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत; टायरच्या ट्यूबवर बसून नदीतून जीवघेणा प्रवास
देशाची एका बाजूला डिजिटल इंडिया कडे वाटचाल सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र शिक्षण घेण्यासाठी पालघरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात टाकून शिक्षणासाठी शाळेपर्यंत पोहचावं लागतंय . नदीवर पूल नसल्याने विक्रमगडच्या म्हसे गावातील विद्यार्थी पावसाळ्यात नदीतून वाहणाऱ्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून चक्क टायरमधील रबराच्या ट्यूबवर नदी पार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. म्हसे गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी पिंजाळ नदी पार करून वाकी येथील शाळेत शिक्षणासाठी जातात . उन्हाळ्यात या नदीत पाण्याचा प्रवाह कमी असल्याने हे विद्यार्थी सहजच नदी ओलांडत असले तरी पावसाळ्यात नदीतील वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात देखील आपल्या जीवाची पर्वा न करता हे विद्यार्थी टायर मधील ट्यूबच्या आधारावर जीवघेणा प्रवास करून आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत. शिवाय नदी पार करताना रोज या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील तारेवरची मोठी कसरत करावी लागते . मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिंजाळ नदीवर पुलाची मागणी असताना देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थ्यांसोबत काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय.