हिंगोली : महाराष्ट्रतील शेतकरी आता पारंपारिक शेती न करता शेतकरी आपल्या शेतात नवे प्रयोग करताना दिसत आहे. याच प्रयोगातून लाखो रुपयांचा नफादेखील मिळवताना दिसत आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं  झेंडू, गलांडा, निशिगंध, क्लस्टर गुलाब यासह विविध फुलांची लागवड  केली आहे. गजानन माहुरे  असं शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या फुल शेतीच्या माध्यमातून ते लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहे. सुरुवातीला दीड एकर शेतीमध्ये सुरू असलेली फुल शेती आता सहा एकरपर्यंत पोहचली आहे.


फुलांची वाढती मागणी लक्षात घेता तीन एकर जमीन भाडेतत्वावर घेतली


हिंगोली जिल्ह्यातील डीग्रस येथील शेतकरी गजानन माहुरे गेल्या पंचवीस वर्षापासून फुल शेतीचे उत्पादन घेत आहेत सुरुवातीला स्वतःकडे असलेल्या वडिलोपार्जित दीड एकर शेतीमध्ये शेतकरी माहुरे यांनी फुल शेतीची लागवड करायचे ठरवले. शेत जमीन हलकी ते मध्यम स्वरूपाची असल्याने अल्पावधीतच त्यांना फुलशेतीतून चांगलं उत्पन्न मिळू लागलं.  त्याच दीड एकर शेतातील फुलांच्या उत्पन्नाच्या जोरावर पुढे शेतकरी गजानन माहुरे यांनी दुसरी दीड एकर शेती खरेदी केली आणि त्या शेतातही फुलांची लागवड केली. तीन एकर शेतातील फुलांचे उत्पादन सुद्धा कमी पडत होते.  कारण मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती हीच मागणी लक्षात घेता आता शेतकरी गजानन माहुरे यांनी स्वतःकडे असलेली तीन एकर आणि इतर भाडेतत्त्वावर तीन एकर शेती घेत सहा एकर शेतामध्ये फुलांचे उत्पादन घेत आहेत.


दररोज चार ते पाच हजार रुपयांचं उत्पन्न 


 माहुरे यांनी आता झेंडू, गलांडा, निशिगंध, क्लस्टर, गुलाब यासह विविध फुलांची लागवड केली आहे या पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी गजानन माहुरे यांनी विहीर तयार करून त्या विहिरीतील पाणी ठिबकच्या साह्याने या फुल शेतीला दिले जात आहे. शेतात विक्रीसाठी तयार झालेल्या फुलांच्या तोडणीला सकाळी पाच वाजल्यापासून  सुरुवात होते. तोडलेली फुले नांदेडच्या बाजारपेठेत घाऊक बाजारात विक्री केली जातात. या फुल शेतीमधून शेतकरी गजानन माहुरे यांना दररोज 4-5 हजार रुपयांचे उत्पन्न निघते प्रत्येक महिन्याला खर्च वजा करता एक लाख रुपयाचा निव्वळ नफा होत आहे. 


फुलशेतीचा प्रयोग यशस्वी


 गजानन माहुरे यांच्या  शेतामध्ये दररोज चार ते पाच महिला शेतातील फुल तोडणी त्याचबरोबर इतर कामासाठी आहेत. सकाळी पाच वाजता दिवस सुरू होतो,  त्यामुळे या फुल शेतीतून रोजगार देखील उपलब्ध होत आहे. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर गजानन माहुरे यांनी फुलशेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांचा हा प्रवास नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. 


हे ही वाचा : 


Farmer Success Stories : पैठणच्या शेतकऱ्याला शिमला मिरचीने केले मालामाल; मिळतेय लाखोचे उत्पादन