हिंगोली : आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा (Crop Insurance) कंपनीच्या लोकांकडून पंचनामे करण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात समोर आला आहे. तर, पैसे मागणाऱ्या या पीक विमा कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. पैसे मागणाऱ्या विमा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांचे हात बांधून थेट पोलीस ठाण्यात त्यांची वरात काढण्यात आली. त्यानंतर या दोन्ही कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 


अधिक माहितीनुसार, पीक विमा कंपनीचे कर्मचारी नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी चक्क शेतकऱ्याकडून पैसे घेत असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या कर्मचाऱ्यांचे हात बांधत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील चार-पाच दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी तशा तक्रारी पीक विमा कंपनीकडे केल्या होत्या. त्यानंतर, पीक विमा कंपनीचे कर्मचारी पंचनामे करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील माळहिवडा या गावांमध्ये दाखल झाले होते. मात्र, या कर्मचाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांना चक्क पैसे मागितले. दरम्यान याची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारला. तसेच दोघांचे हात बांधून त्यांना पोलीस ठाण्यात नेले. तसेच पोलिसांच्या ताब्यात देऊन कारवाईची मागणी केली. 


नुकसानभरपाई मिळवून देण्याची आश्वासन? 


हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला कळवली होती. त्यानुसार संबंधित विमा कंपनीचे काही कर्मचारी पंचनामे करण्यासाठी गावात पोहचले. पण, यावेळी या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी केली. तुमच्या झालेल्या नुकसानापेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचे पंचनामे करतो, त्यामुळे तुम्हाला अधिकचा पीक विमा मिळेल असे आश्वासन या विमा कर्मचाऱ्यांकडून देण्यात आले. काही शेतकरी त्यांच्या खोट्या आश्वासनला बळी देखील पडले. पण, याची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवली. तसेच, पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना यांना जाब विचारून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सोबतच, याबाबत कृषी अधिकाऱ्यांकडे देखील तक्रार करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Crop Insurance Scam : बीडच्या पीक विमा घोटाळ्याचे कनेक्शन थेट तेलंगणापर्यंत; चक्क एमआयडीसीच्या जागेवर काढला विमा