हिंगोली : जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे दुचाकी लावण्यावरून दोन गटात राडा झाला आहे. या वादाचे रूपांतर दगडफेकीमध्ये झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे यावेळी दोन्ही गटाच्या वतीने दगडफेक करण्यात आली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. तसेच, गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे बाळापुर शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
दुचाकी लावण्यातून झालेल्या वादातून हिंगोलीच्या आखाडा बाळापूर येथे दोन गटांत राडा होऊन दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. 29 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते, तर दुसऱ्या दिवशी 30 सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत बाजारपेठ कडकडीत बंद होती. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
अधिक माहितीनुसार, बाळापूर येथील नांदेड- हिंगोली मुख्य रोडवर अशरफी ट्रेडर्स दुकानासमोर मोटारसायकल लावण्यावरून वाद झाला. थोड्याच वेळात मोठा जमाव जमला आणि एकाला शिवीगाळ करून थापड बुक्क्यांनी मारहाण केली. वाद एवढा वाढला की दगडफेक करण्यात आली. यावेळी वादाच्या ठिकाणी माजी उपसरपंच विजय पाटील बोंढारे आले असता दगडफेकीत एक दगड त्यांना लागून दुखापत झाली. त्यामुळे पुन्हा दोन गटांमध्ये तुफान राडा होऊन दगडफेक झाली. दरम्यान या राड्यात आशरफी ट्रेडर्स हार्डवेअरच्या दुकानाचे, दुकानातील सामानाचे व दुकानासमोरील एका मोटारसायकलचे असे एकूण 70 हजारांचे नुकसान झाले आहे.
अतिरिक्त कुमक मागवावी लागली...
बाळापूर येथील नांदेड-हिंगोली मुख्य रोडवर राडा सुरू असल्याची माहिती मिळताच बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील गोपीनवार उपस्थित फौजफाट्यासह तेथे पोहोचले. परंतु, दोन गट मोठ्या संख्येने जमले होते. त्यामुळे त्यांनी तत्काळ अतिरिक्त कुमक मागविली. पण, तोपर्यंत या दोन्ही गटांना शांत करण्याचे काम त्यांना करावे लागले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर दोन्ही गट शांत झाले आणि वाद मिटला. मात्र, पोलीस ठाण्यातही रात्री मोठा जमाव जमला होता. विशेष म्हणजे, दोन्ही गटाचे कोणीही पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास तयार नसल्याने पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. सध्या गावात शांतता असून, पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, अफवा पसरवणाऱ्या लोकांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन हिंगोली पोलिसांकडून करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: