बीड : मागील काही दिवसांपासून बीड (Beed) जिल्ह्यात सतत पीक विमा घोटाळ्याचे (Crop Insurance Scam) प्रकार समोर येत आहे. दरम्यान, आता याच बीड शहरात पीक विमा घोटाळ्याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. कारण, चक्क बीड नगरपालिकेच्या जमिनीला गायरान जमीन दाखवून याच जमिनीचा 30 हजार रुपयांचा पिक विमा (Crop Insurance) भरण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे बीड जिल्ह्यातील पीक विमा घोटाळ्याचे कनेक्शन थेट तेलंगणापर्यंत असल्याचे समोर आले आहे. सोबतच राज्यातील अनेक जिल्ह्यात देखील या घोटाळ्याचा संबध असल्याचे समोर येत आहे.


शेतीचा नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून, पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. मात्र, या योजनेमध्ये आता बोगस पीक विमा भरून लाभ घेणाऱ्यांची टोळी बीडमध्ये सक्रिय असल्याचे समोर येत आहे. यामध्ये, नगरपालिका आणि एमआयडीसीची जागा ही गायरान जमीन दाखवून 264 जणांनी बारा हजार हेक्टर जमिनीचा पिक विमा भरला आहे. हा सर्व प्रकार कृषी विभागाने महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. विशेष म्हणजे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा हा जिल्हा असून, याच ठिकाणी पीक विमा घोटाळ्याचे एकामागून एक प्रकरण समोर येत आहे.


दरम्यान बीड जिल्ह्यातील पीक विमा घोटाळ्याचे प्रकार समोर आल्यावर, भारतीय पीक विमा कंपनीकडून याची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, पीक विमा कंपनीच्या चौकशीमध्ये वेगवेगळे नवीन प्रकरणं आता समोर येत आहेत. विशेष म्हणजे, तेलंगणा राज्यासह छत्रपती संभाजीनगर, जालना, कोल्हापूरपुणे जिल्ह्यातील काही व्यक्तींनी बीड नगरपालिकेची जागा गायरान जमीन दाखवून त्यावर विमा उतरवल्याचा धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. अशा प्रकारे बोगस विमा काढणाऱ्यांची संख्या मोठी असून, ही रक्कम 12 कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची तपासणी पिक विमा कंपनी, महसूल आणि कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. 


चक्क एमआयडीसीच्या जागेवर भरला पीक विमा...


सरकारने 1 रुपयात पीक विमा देण्याची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. दरम्यान, याचाच फायदा उचलत बीड जिल्ह्यात काहींनी विम्याचा मोबदला लाटण्यासाठी खोटी माहिती भरून पीक विमा घोटाळा केला आहे. यावेळी, एमआयडीसी परिसरातील 467 एकर जमीन शेती असल्याचे दाखवून पीक विमा भरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. तब्बल 180 लोकांच्या नावावर हा विमा भरण्यात आला होता. दरम्यान, आता या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असतांना अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Crop Insurance Scam : कुठे एमआयडीसीच्या जागेवर, तर कुठे शेतच नसतानाही भरला विमा; कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच पीक विमा घोटाळे