Hingoli Lok Sabha : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी जगावाटावरून महायुतीत (Mahayuti Seat Sharing) तिढा निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी उमेदवार जाहीर होऊन देखील स्थानिक कार्यकर्त्यांकडून उमेदवाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. हिंगोलीची जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली असून शिंदे गटाने हेमंत पाटील (Hemant Patil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला भाजपकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत गोंधळ झाल्याचे दिसून आले. हेमंत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 


बैठकीनंतर भाजपचे आमदार भीमराव केराम (Bhimrao Keram) यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून ही जागा शिवसेनेला देण्यात आली आहे. या मतदारसंघात भाजपचे तीनही आमदार आणि कार्यकर्ते इथे भाजपाचा उमेदवार असावा, अशी मागणी आम्ही नेतृत्वाकडे करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.   


...म्हणून बोलावली होती बैठक 


आम्हाला आशा होती की, ही जागा भाजपला सुटेल. शेवटी पक्षाच्या नेतृत्वाने वाटाघाटीत ही जागा शिवसेनेला सुटली त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली नाही. मतदारसंघातील नेते कार्यकर्ते एकत्र बसून सामूहिक पद्धतीने उद्याच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये आमचा एक प्रतिनिधी असावा या दृष्टीकोनातून या दृष्टीने बैठक आयोजित करण्यात आली होती. 


उमेदवारीचा फेरविचार व्हावा


दोन दिवसात आमच्या नेतृत्वाकडे आमच्या भावना कळवणार आहोत आणि उमेदवार बदलावा अशी विनंती करणार आहोत. हिंगोली मतदार संघातून भाजपला उमेदवारी दिली गेली पाहिजे. दिलेली उमेदवारी रद्द करून त्या ठिकाणी फेरविचार व्हावा, हीच आमची विनंती आहे.  ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच मत मांडलं. त्या पध्द्तीने आम्ही आमचं मत मांडणार आहोत. शिवसेना म्हणत असेल की हिंगोली त्यांचा बालेकिल्ला आहे. आम्हीही म्हणतो हिंगोली आमचा बालेकिल्ला आहे. आमचा बालेकिल्ला नसेल तर आम्ही कशाला उमेदवारी मागितली असती. 


कोणाचा बालेकिल्ला आहे हे लोकांच्या भावनेवरून कळेल


त्यांचा एकही आमदार इथे नाही भाजपचे तीन आमदार आहेत. कोणाचा बालेकिल्ला आहे हे तुम्हाला लोकांच्या भावनेवरून कळेल. त्यामुळे फेरविचार करून ही जागा भाजपला सुटेल यासाठी आम्ही तीनही आमदार प्रयत्न करणार आहोत. कोणाला उमेदवारी देऊन कोणत्या पक्षाकडून लढायचे हा पक्ष नेतृत्वाचा निर्णय आहे. आमचा निर्णय नाही. भाजपच्या नेतृत्वाकडे इथल्या भावना पोहचवण्याचे काम आमचे आहे, ते काम आम्ही करणार आहोत. 


हेमंत पाटलांविरोधात जोरदार घोषणाबाजी


हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपमधून मोठा विरोध होत आहे. हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून आज भाजपची आढावा बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे आगामी काळात हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना विरुद्ध भाजप हा वाद कसा मिटणार? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. 


आणखी वाचा 


अरविंद केजरीवाल शेर है! तुम्ही त्यांना जास्त दिवस तुरुंगात ठेऊ शकणार नाहीत, रामलीला मैदानातून सुनिता केजरीवाल कडाडल्या