एक्स्प्लोर
Advertisement
गारपिटीचा 11 जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टरला फटका
गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि रब्बी हंगामामधील फळ पिकांना मोठा फटका बसला आहे. सर्वाधिक फटका बुलडाणा, अमरावती आणि जालना जिल्ह्याला बसला आहे.
मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 11 जिल्ह्यातील सुमारे 50 तालुक्यांमधील 1086 गावांमधील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि रब्बी हंगामामधील फळ पिकांना मोठा फटका बसला आहे. सर्वाधिक फटका बुलडाणा, अमरावती आणि जालना जिल्ह्याला बसला आहे.
कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी याबाबत माहिती दिली. शनिवारी आणि रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात शेतीचं आणि काढणी झालेल्या मालाचं मोठा प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानीबाबत पंचनामा करण्याचे आदेश काल कृषीमंत्र्यांनी दिले होते.
या बाधित जिल्ह्यांमध्ये कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रिय पाहणी केली. महसूल प्रशासन आणि कृषी अधिकारी यांनी राज्य शासनाला नुकसानीबाबत प्राथमिक अहवाल सादर केला आहे. बाधित 11 जिल्ह्यांमध्ये बीड, जालना, परभणी, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली यांचा समावेश आहे.
मराठवाड्यात सर्वाधिक फटका जालना जिल्ह्याला
बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, शिरुर या तीन तालुक्यातील 42 गावातील 10 हजार 632 हेक्टर क्षेत्रातील पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला. यामध्ये प्रामुख्याने रब्बी ज्वारी, हरभरा, फळ पिके, भाजीपाला यांचा समावेश आहे.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद, मंठा, जालना, परतूर, अंबड या पाच तालुक्यातील 175 गावांमधील 32 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे.
परभणी जिल्ह्यातील सेलू आणि जिंतूर तालुक्यांमधील 23 गावातील 3 हजार 595 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. जालना आणि परभणी जिल्ह्यातही रब्बी ज्वारी, हरभरा, फळ पिके, भाजीपाला या पिकांचं नुकसान झालं आहे.
लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, उदगीर, अहमदपूर आणि चाकूर या पाच तालुक्यामधील 59 गावातील 2 हजार 679 क्षेत्रावरील ज्वारी, गहू, हरभरा पिकाचं नुकसान झालं आहे.
उमरगा आणि उस्मानाबाद या दोन तालुक्यातील 26 गावांमधील 583 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालं आहे.
तर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव आणि औंढा या दोन तालुक्यातील 30 गावांमधील 143 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे.
उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात मोठं नुकसान
जळगाव जिल्ह्यात जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर या तीन तालुक्यातील 38 गावांचा समावेश असून 2 हजार 495 हेक्टर क्षेत्रावरील केळी, मका, गहू, कांदा आणि हरभऱ्याचं नुकसान झालं आहे.
विदर्भात अमरावती, बुलडाण्याला फटका
विदर्भात गारपीट आणि अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बुलडाणा जिल्ह्याला बसला आहे. चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदूर, मेहेकर, लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या 10 तालुक्यातील 286 गावांमधील 32 हजार 700 हेक्टर क्षेत्रावरील हरभरा, गहू, कांदा, फळ आणि भाजीपाल्याचं नुकसान झालं आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, धारणी, अंजणगाव सुरजी आणि चिखलदरा या आठ तालुक्यातील 270 गावातील 26 हजार 598 हेक्टर क्षेत्रावरील संत्रा, हरभरा, गहू, कांदा, भाजीपाल्याचं नुकसान झालं आहे.
अकोला जिल्ह्याती मुर्तीजापूर, बार्शी टाकळी, अकोला, अकोट, पातूर, बाळापूर आणि तेल्हार या सात तालुक्यातील 101 गावांमधील 4 हजार 360 हेक्टरवरील संत्रा, हरभरा, गहु, कांदा या पिकांचे नुकसान झालं आहे.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील 36 गावांमधील 8 हजार 509 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. अशा पद्धतीने एकूण 1086 गावातील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, बाधित क्षेत्राच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. क्षेत्रिय स्तरावरुन पुढील दोन ते तीन दिवसात नुकसानाचा परिपूर्ण अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती पांडुरंग फुंडकर यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
कोल्हापूर
कोल्हापूर
Advertisement