Gondia News: श्रीकृष्ण मूर्ती विसर्जन करताना जवानाचा बुडून मृत्यू; सुट्टीवर आल्यानंतर काळाचा घाला
Gondia News: भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला हा जवान काही दिवसांपूर्वीच सुट्टी काढून आपल्या बेरडीपार या मूळ गावी आला होता.

Gondia News: श्रीकृष्ण मूर्ती विसर्जना दरम्यान तिरोडा तालुक्यातील बेरडीपार येथे भारतीय सैन्य दलातील एका जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुट्टीवर आलेल्या जवानाचा असा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरावर आणि बेरडीपार गावावर शोककळा पसरली. कार्तिक गौतम (34) असे मृत जवानाचे नाव आहे. भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला हा जवान काही दिवसांपूर्वीच सुट्टी काढून आपल्या बेरडीपार या मूळ गावी आला होता. गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी व त्यानंतरच्या उत्सवाचा उत्साह असताना, मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत तो आनंदाने सहभागी झाला होता. विसर्जना दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दोन वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यात खामखुरा येथील पडक्या घराची भिंत पावसामुळं ओली होऊन कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 2 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. प्रतीक्षा राऊत असे मृत चिकुमलीचे नाव आहे. खामखुरा येथील विलास नेवारे यांच्या पडक्या घराची भिंत पावसामुळे ओली झाल्याने अचानक कोसळली. त्यावेळी अंगणात खेळत असलेली चिमुकली प्रतीक्षा भिंतीखाली दबली आणि जागीच मृत्यू झाला. प्रतीक्षाचे आई-वडील शेतमजुरीचे काम करतात. कामानिमित्त वडील दररोज सकाळी खामखुरा येथील नातेवाईक केशव नेवारे यांच्या घरी सोडत होते. सायंकाळी पुन्हा कोरंभी येथील घरी घेऊन जात होते. मात्र, चिमुकली अंगणात खेळत असताना भिंत पडून तिचा मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO





















