गोंदिया : गिफ्ट पाठवतो असं म्हणत शिक्षिकेला (Teacher) तब्बल 12 लाख 35 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. गोंदिया (Gondia) जिल्ह्यात हा प्रकार समोर आला. फसवणूक (Fraud) झालेली शिक्षिका ही गोरेगाव तालुक्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिचगावटोला इथे कार्यरत आहे. या महिलेची अमेरिकेतील (America) व्यक्तीशी फेसबुकवरुन (Facebook) मैत्री झाली होती.


आपण अमेरिकेत वास्तव्यास असल्याचं त्याने शिक्षिकेला सांगितलं. त्याने शिक्षिकेला महागडे गिफ्ट पाठवण्याचे सोंग केलं. त्याच्या या नाटकात इतर तिघांचा समावेश होता. ते गिफ्ट दिल्लीला आले, आता घरापर्यंत येण्यासाठी त्याचे चार्ज पे करावे लागतील, असं सांगत शिक्षिकेला तब्बल 12 लाख 35 हजार 600 रुपये लुटल्याचा प्रकार घडला आहे.


शिक्षेकडून पत्ता मागवला अन्


या शिक्षिकेचं फेसबुकवर अकाऊंट असून जून 2023 मध्ये तिची जॅक्सन जेम्स या तरुणासोबत मैत्री झाली होती. मैत्री झाल्यानंतर जॅक्सन जेम्स या तरुणाने माझा वाढदिवस आहे. मी तुम्हाला गिफ्ट पाठवतो, तुमचा पत्ता सांगा, असं म्हणत शिक्षेकडून पत्ता मागवला आणि त्या पत्त्यावर गिफ्ट पाठवल्याचं नाटक केलं. 


कशी झाली फसवणूक?


पहिल्यांदा शिक्षिकेकडून कस्टम क्लिअरन्स चार्जेसच्या नावावर 75 हजार रुपये मागितले. त्यानंतर नो-ड्रग्ज सर्टिफिकेट आणि नो-टेररिस्ट सर्टिफिकेटकरता 7 लाख 60 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. परंतु आपल्याकडे पैसे कमी असल्याचे सांगत शिक्षिकेने 6 लाख 60 हजार रुपये पाठवले. त्यानंतर अदनान मोहिंदर नावाच्या व्यक्ती शिक्षिकेला व्हॉट्सअॅपवर मेसेज करुन तुमच्या पार्सलमध्ये अतिशय महागड्या वस्तू आहेत. त्यासाठी तुम्हाला त्या वस्तूंच्या किमतीच्या 10 टक्के म्हणजेच 15 लाख 45 हजार रुपये चार्जेस पेड करावे लागतील असं सांगितलं. त्यानंतर शिक्षिकेने 14 जून रोजी 2 लाख 30 हजार आणि 15 जून रोजी 2 लाख 70 हजार रुपये चेकद्वारे अदनान मोहिंदरने पाठवलेल्या अकाऊंटवर पाठवले. असे 12 लाख 35 हजार 600 रुपये त्यांच्याकडून उकळून त्यांची फसवणूक केली. 


पोलिसात तक्रार दाखल


आपली फसवणूक झाल्याची लक्षात येतात या शिक्षिकेने गोरेगाव पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी भादंविच्या कलम 420, 34 सह कलम 66 (ड) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास गोरेगाव पोलीस करत आहेत. 


हेही वाचा


Nagpur Online Fraud : व्यापाऱ्याची 58 कोटींची फसवणूक करुन दुबईत पळ, सोंटू जैन आता दुसऱ्या देशात पळून जाण्याच्या तयारीत?