Gondia Crime News गोंदिया : गोंदिया (Gondiya) जिल्ह्याच्या आमगाव येथील मोबाईल दुकानातून साडेपाच लाखांहून अधिक रुपयांचे मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये हा प्रकार घडला होता. त्यानंतर या प्रकरणातील चोरट्यांनी पोलिसांना गुंगारा देत परराज्यात पळ ठोकला होता. अखेर या संशयित आरोपींना (Gondia Crime News) चार महिन्यानंतर झारखंड राज्यातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष बाब म्हणजे हे आरोपी बांगलादेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी विशेष पथक नेमून त्यांना बेड्या ठोकल्या आहे. 


चोरट्यांनी दुसऱ्या राज्यात  ठोकला होता पळ 


गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव येथे पवार एजन्सीज या नावाचे मोबाईलचे दुकान आहे. 2 ऑक्टोबर 2023 च्या रात्री काही अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला. ज्यामध्ये चोरट्यांनी 5 लाख 59 हजार 492 रुपय किमतीचे मोबाईल आणि इतर साहित्य पळवले. ही चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर दुकानदाराने तत्काळ आमगाव पोलीस स्टेशन गाठून या प्रकरणाची माहिती देत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. दरम्यान, या चोरट्यांनी दुसऱ्या राज्यात पळ ठोकला. त्यानंतर पोलिसांनी विशेष पथक नेमून या संशयितांचा शोध सुरू केला असता हे सशयित आरोपी झारखंड राज्यातील राधानगर पोलीस ठाणे हद्दीतील पियारपूर गावामध्ये असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली.


चार महिनानंतर संशयितांना ठोकल्या बेड्या  


मिळालेल्या माहितीच्या आधारे आमगाव पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींच्या घरी धाड टाकली. यावेळी आरोपी बांगलादेशमध्ये पळून जाण्याचा तयारीत असल्याचे उघड झाले. त्यापूर्वीच पोलिसांनी या संशयित आरोपींना पकडून बेड्या ठोकल्या. लुटू जमीदार शेख (30, रा.अजमतटोला, झारखंड), आणि असरुद्दीन मुस्ताक शेख (40, झारखंड) असे पकडण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या आरोपींकडून गुन्हातील चोरीला गेलेल्या मोबईल पैकी 2 मोबाईल सापडून आले आहे. तर उर्वरित मोबाईलचा शोध पोलीस घेत आहे. पोलिसांनी या संशयितांविरुद्ध अपराध क्र. 331/2023 कलम 454,457,380 भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. 


ही कारवाई गोंदियाचे पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, आमगांव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, आमगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युवराज हांडे आदींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 


इतर महत्वाच्या बातम्या