गोंदिया : गोंदिया नगरपरिषदेचे माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव गोळीबार प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारातुन झालेल्या वादातून गोळीबार झाला होता. त्यानंतर या प्रकरणातील एकूण सहा आरोपींपैकी चार आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. गणेश शर्मा (21), अक्षय मानकर (28), धनराज उर्फ रिंकू राऊत (32) आणि नागसेन मंतो (41) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 


गोंदिया नगर परिषदेचे माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर 11 जानेवारीला दोन अज्ञात आरोपींनी यादव चौकात गोळीबार करीत पळ काढला होता. ते दोन्ही आरोपी परिसरात लागेलेल्या सीसीटीव्ही कैमऱ्यात कैद झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकणात दोन आरोपींना नागपुरातून तर दोन आरोपीना गोंदियातून अटक केली आहे. 


दोन आरोपी अद्याप फरार


अटक करण्यात आलेले दोन आरोपी हे नागपुर जिल्ह्यातील तर दोन आरोपी गोंदियातील आहेत. तर प्रशांत मेश्राम आणि रोहीत मेश्राम यांच्या सांगण्यावरून गणेश शर्मा याने यादव यांच्यावर गोळीवर केला. यातील प्रशांत मेश्राम आणि रोहीत मेश्राम हे दोन्ही आरोपी अद्यापही फरार आहेत.  


लोकेश उर्फ कल्लू यादव हे शिवसेना ठाकरे गटाचे गोंदिया जिल्हाप्रमुख पंकज यादव यांचे छोटे बंधू असून ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. लोकेश यादव हे 11 जानेवारी ला हेमु कॉलोनी येथे थांबले असताना दोन अज्ञात आरोपींनी दुचाकी वाहनाने येत लोकेश यादव यांच्यावर गोळीबार केला. यात लोकेश यादव गंभीर जखमी झाले होते. 


यादव प्राथमिक उपचार गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले. पुढील उपचाराकरिता नागपूरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  लोकेश यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर हा गोळीबार आर्थिक व्यवहारातून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. 


कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह


दिवसाढवळ्या गोळीबाराच्या या घटनेमुळे या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. गोळीबार करणारे मारेकरी नेमके कोण हे समोर आलं आहे. इतर दोन फरार आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत असून पुढील तपासाला वेग आला आहे. मात्र या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही काळात नागपूरसह विदर्भात अवैध बंदुकीचा वापर होताना आढळून आला आहे. शिवाय पोलिसांनी अनेकांच्या मुसक्यादेखील आवळल्या आहेत. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रांचे घबाड पोलिसांच्या हाती लागले आहे. मात्र गुरुवारच्या घटनेमुळे गुंडांना पोलिसांचा धाक नाही का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. 


ही बातमी वाचा: